यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची नियमावली जाहीर


मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्यापर्यंत राज्यातील सर्वच सण आपण साधेपणात साजरे केले आहेत. त्याचबरोबर 2020 वर्षातील अनेक गावच्या जत्रा-यात्रा, मोठमोठे सोहळे या संकटामुळे रद्द करण्यात आले आहे. अगदी पंढरपूरच्या आषाढी वारीवर देखील कोरोनाचे संकट आहे. अशातच यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव येत असल्याने सर्वच गणेशभक्तांना, तसेच मूर्ती शाळेतील कामगारांना चिंता लागून राहिली आहे. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यामध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने जाहिर केलेल्या नियमावलीनुसार मुंबईतील मोठ्या मंडळांनी (आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. पण केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करावे.

तसेच कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीच्या मुर्तीचा आग्रह धरावा. शक्य असल्यास शाडूच्या मूर्तीस प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा. या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.

श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जावे. त्यावेळी मास्क व सॅनिटीझर जवळ बाळगणे, तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणावी. मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस (भटजी कार्यकर्ते इ.) हात-पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करावी. गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. त्याचबरोबर आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी, जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी. दरम्यान या वर्षी 22 ऑगस्टला गणेश उत्सव सुरू होत असून तोपर्यंत कोरोनाची राज्यात काय परिस्थिती असेल त्यावरही ही नियमावली अवलंबून असणार आहे.

Leave a Comment