‘मदर्स डे’चा असा आहे रोचक इतिहास


जगभरामध्ये, मे महिन्यातील दुसरा रविवार हा दिवस समस्त मातांना समर्पित असून, हा दिवस ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जात असतो. वास्तविक आपली आई आपल्यासाठी किती लहान मोठे त्याग, तडजोडी करीत असते याचा विचार आपण फारसा कधी करतच नाही. किंबहुना आईला नेहमी अनेक बाबतीत गृहीतच धरले जाते. आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी, आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आईने तिच्या आवडीनिवडी, तिच्या इच्छा बाजूला ठेवलेल्या असतात हेच मुळी आपल्या ध्यानी येत नाही. आपल्या अपत्याला आयुष्यामध्ये सर्व काही त्याच्या मनासारखे करता यावे यासाठी आई सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे दिवसरात्र केवळ आपल्या अपत्याच्या भल्यासाठी झटणाऱ्या आईला समर्पित असा हा खास ‘मदर्स डे’ साजरा करीत असताना आपल्या आईने आपल्यासाठी आजवर केलेल्या सर्व त्याग आणि तडजोडींसाठी, तिने आपल्याला दिलेल्या उत्तम आयुष्यासाठी आणि संस्कारांसाठी तिचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आता जगभरामध्ये रूढ होऊ लागली आहे.

‘मदर्स डे’ हा दिवस बहुतेक सर्वच देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जाण्याची पद्धत आहे. अमेरिकन राष्ट्रपती वूड्रो विल्सन यांनी, मे महिन्यातील दुसरा रविवार ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जावा असा अध्यादेश जारी केल्यानंतर हा दिवस भारतासमवेत अनेक देशांमध्ये साजरा होऊ लागला. हा दिवस साजरा करण्याची पद्धत अस्तित्वात आली कशी, याचा इतिहास मोठा रोचक आहे. या दिवसाची सुरुवात कशी झाली, याबद्दल अनेक मान्यता आहेत. काही जणांच्या मान्यतेनुसार हा दिवस साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली. व्हर्जीनियाची निवासी असलेल्या एना जार्विस नामक महिलेने मदर्स डे साजरा करण्याचा प्रघात सुरु केल्याचे म्हटले जाते. एनाचे आपल्या आईवर अतिशय प्रेम असून, आपल्या आईच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव एनाच्या आयुष्यावर होता. आपल्या आईच्या मृत्युनंतर तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ एनाने ‘मदर्स डे’ची सुरुवात केली असल्याचे म्हटले जाते. तर ख्रिश्चन समुदायामध्ये ‘व्हर्जिन मेरी’च्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जाण्याची रीत आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये हा दिवस ‘मदरिंग संडे’ म्हणून साजरा केला जातो. या खास दिवसाबद्दल असलेल्या आणखी एका मान्यतेच्या अनुसार मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात ग्रीस देशामध्ये झाली. ग्रीक संस्कृतीमध्ये मातेला मोठे मानाचे स्थान असून, प्राचीन काळामध्ये या दिवशी आपल्या आईची पूजा करण्याचा प्रघात असे. ग्रीक संस्कृतीमध्ये ‘स्यबेसे’ नामक देवीला समस्त प्राणीजनांची माता मानले जात असून, या देवीच्या पूजेची पद्धतही ‘मदर्स डे’च्या दिवशी रूढ होती.

Leave a Comment