यंदा लोकांकडून वर्गणी न घेता साजरा करणार गणेशोत्सव


दरवर्षी मोठ्या थाटात आणि धुमधडाक्यात मायानगरी मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जातो. पण यंदा कोरोना व्हायरसच्या संकटाचे गणेशोत्सवावर सावट असल्यामुळेच यंदा लोकांकडून वर्गणी न काढता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्लीने घेतला आहे.

मुंबईचा राजा म्हणून गणेशगल्लीचा गणपती प्रसिद्ध आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात लाखो भाविक गणेश गल्लीतील गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. पण यंदा लोकांच्या उत्पन्नावर कोरोना व्हायरसमुळे मोठा परिणाम झाला असल्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा वर्गणी न काढता उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे राज्यातील लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, आणि अशा परिस्थितीत आम्हाला त्यांच्यावर वर्गणीचा भार टाकायचा नसल्यामुळेच यंदा आम्ही वर्गणी न काढण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाच्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. मंडळाच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. मुंबईत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून त्यात मुंबई रेड झोनमध्ये आहे. मागच्या ४० दिवसांपासून अनेक दुकाने, व्यवसाय बंद आहेत. लोकांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment