मास्टर ब्लास्टरची रोजंदारीवर काम करणाऱ्या ४ हजार लोकांना आर्थिक मदत


मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनचा तिसऱ्या टप्पा सुरु असून हा लॉकडाऊन १७ मे पर्यंत लागू राहणार आहे. मजूर-कामगार व रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे या काळात प्रचंड हाल होत आहेत. या लोकांच्या मदतीसाठी समाजातील अनेक महत्वाच्या व्यक्ती पुढे येत आहेत. त्यातच आता क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील रोजंदारीवर काम करणाऱ्या ४ हजार लोकांना आर्थिक मदत केली आहे. यात मुंबई महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांचाही समावेश आहे.


High5 या स्वयंसेवी संस्थेला देखील सचिनने आर्थिक मदत केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर सचिनने या संस्थेला शुभेच्छा देत, गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी आपण छोटीशी मदत करत असल्याचे सांगितले आहे. सचिनने याआधीही मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला प्रत्येकी २५ लाखांची मदत केली आहे. सचिनने याआधीही मुंबईत ५ हजार लोकांच्या अन्न-धान्याची सोय केली होती. याचसोबत अनेक आंतरराष्ट्रीय संस्थाच्या कोरोनाविरुद्ध लढ्यात सचिन सहभागी झाला होता.

Leave a Comment