इंडिगो सर्व वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात करणार कपात


नवी दिल्ली – विमानसेवा पुरवणाऱ्या भारतातील आघाडीच्या इंडिगो कंपनीने मे महिन्यापासून सर्व वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करणार असल्याचे जाहीर केले असून त्याचबरोबर मे, जून आणि जुलै या काळात काही कर्मचाऱ्यांना विनापगार सुट्टीवर पाठवले जाणार आहे.

कंपनीचे सीईओ रणजय दत्ता यांनी याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना इ-मेल पाठवला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार आम्ही दिला असून आता पगार कपात करण्याशिवाय आमच्याकडे अन्य कोणताही पर्याय नसल्यामुळे जी पगार कपात मार्चमध्ये जाहीर केली होती, त्याप्रमाणे मे २०२० पासून पगार कपात केली जाईल, असे दत्ता यांनी आपल्या इ-मेलमध्ये नमूद केले आहे. त्याचबरोबर कंपनीचा खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात न करण्याचा प्रयत्न असेल, असेही दत्ता यांनी म्हटले आहे.

इंडिगोने पगार कपात करण्याचे १९ मार्च रोजी जाहीर केले होते. पण, सरकारने कुणीही वेतन कपात करू नये असे आवाहन केल्यानंतर कंपनीकडून २३ एप्रिल रोजी पगार कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला होता. कंपनीचे सीईओ दत्ता यांनी त्यावेळी स्वतःच्या पगारात २५ टक्के कपात करणार असल्याचे सांगितले होते. तर, अन्य वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात १० ते २० टक्के कपात केली जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

Leave a Comment