फेसबुक, गुगलकडून वर्षाअखेर पर्यंत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत


नवी दिल्ली – जगभरातील १८० हून अधिक देश कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरसचा सामना करत आहेत. त्यातच जगभरातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून घरुनच काम करण्याची सवलत दिली आहे. अगदी गुगल आणि फेसबुकसारख्या बड्या कंपन्यांच्याही या कंपन्यामध्ये मसावेश आहे. या दोन कंपन्या आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना हे वर्ष संपेपर्यंत घरुनच काम करण्याची सवलत देणार असून याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच दोन्ही कंपन्याकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

६ जुलैपासून आपली सर्व कार्यालये पुन्हा सुरु करण्याच्या विचारात फेसबुक असल्याचे प्रवक्त्यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितले आहे. पण असे असले तरी घरुन काम करण्याची इच्छा ज्या कर्मचाऱ्यांना आहे ते घरुन काम करु शकतात अशी सवलत देण्यात येणार असल्याचे समजते. यासंदर्भात सर्व नियोजन झाले असून याबद्दलची घोषणा कंपनीचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झकेरबर्ग करु शकतात. ‘द व्हर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार हा निर्णय घेताना फेसबुकने अनेक गोष्टींचा विचार केला आहे. आरोग्य यंत्रणांनी दिलेला इशारा, सरकारने दिलेला इशारा या सर्वांचा विचार करुन काही कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यासंदर्भात कंपनी परवानगी देऊ शकते. सध्या तरी कंपनीचे अनेक कर्मचारी हे घरुनच काम करत आहेत. फेसबुकने याआधीच २०२१ पर्यंतचे सर्व इव्हेंट रद्द करण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकसोबतच गुगलने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० संपेपर्यंत घरुन काम करण्यासंदर्भात सुचना दिल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात द इन्फॉर्मेशनने दिलेल्या वृत्तानुसार ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणे शक्य आहे त्यांनी २०२० संपेपर्यंत सध्या सुरु आहे त्याप्रमाणे घरुनच काम करावे असे, गुगल अल्फाबेटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे. तर याआधी कर्मचारी १ जूनपर्यंत घरुन काम करतील असे कंपनीने म्हटले होते. पिच्चाई यांनी यासोबतच ऑनसाईट काम कऱणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनी जून किंवा जुलैमध्ये आपली कार्यालये सुरु करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. लोकांनी थेट एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून कार्यालयामधील व्यवस्थापनासंदर्भात कंपनी अतिरिक्त काळजी घेणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Leave a Comment