कंटेनमेंट झोनमधून बाहेर पडल्यास थेट विलगीकरण कक्षात रवानगी – तुकाराम मुंढे


नागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील कंटेनमेंट झोन परिसरात घराबाहेर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास त्यांची रवानगी थेट विगलीकरण कक्षात केली जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला आहे. त्याचबरोबर पोलिसांसोबत नागरिकांनी हुज्जत घातल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे देखील तुकाराम मुंढे म्हणाले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांनी या बैठकीत पोलिसांना आणखी कठोर कारवाई करण्याची सूचना केली. पुढचे 15 दिवस नागपुरसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे कंटेनमेंट झोनमधील कुठलीही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही, असा बंदोबस्त करण्याचे आवाहन मुंढेंनी पोलिसांना केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनीदेखील या कठिण प्रसंगी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दिवसागणिक नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काल ( 8 मे) नागपुरात दिवसभरात आणखी दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे नागपुरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा थेट 270 वर पोहोचला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी मेहनत घेत आहे. आतापर्यंत 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पण लॉकडाऊन असतानाही काही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याचे उघडकीस आल्यामुळे नागपूर महापालिकेने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment