भाजप खासदारानेच केली गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी


नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून त्यातच महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यातच आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपच्याच एका खासदाराने केली आहे. गुजरातमधून कोरोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्री विजय रुपानी यांना हटवा अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.


स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंदीबेन पटेल यांना राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री पदी नियुक्त करावे, अशी मागणी केली आहे. कोरोनामुळे गुजरातमध्ये दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करायची असल्यास आनंदीबेन पटेल यांना पुन्हा मुख्यमंत्री पदी नियुक्त करावे, असे स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिवसोंदिवस गुजरातमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांना याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरुन हटवून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हाती राज्याचे नेतृत्व दिले जाण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु असतानाच मांडविया यांनी स्वत:च ट्विट करुन या चर्चांना पूर्णविराम दिला.

संपूर्ण जग जीवघेण्या कोरोना व्हायरसशी लढा देत असून तीच परिस्थिती गुजरातमध्येही आहे. राज्याचे मुख्यमंत्री रुपानी हे चांगल्याप्रकारे नेतृत्व करत आहेत. अशावेळी मुख्यमंत्री बदलण्यासंदर्भात अफवा पसरवणे जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत मांडविया यांनी मांडले आहे.

Leave a Comment