जिनपिंगनंतर किम जोंग उनकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कौतूक


मॉस्को – उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना कौतुकाचे पत्र पाठवत कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्याबद्दल जिनपिंग यांचे त्याने कौतुक केले होते. त्यानंतर आता किम जोंगने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना पत्र पाठवले आहे. किम जोंग उन याने हे पत्र दुसऱ्या महायुद्धात मिळवलेल्या विजयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पाठवले आहे. या पत्रातून दुसऱ्या महायुद्धातील विजयासाठी रशिया आणि पुतिन यांचे किम जोंग उन याने अभिनंदन करत कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईतही रशियाला असेच यश मिळो, असे किमने आपल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

उत्तर कोरियाचा चीन हा अत्यंत जवळचा, भरवशाचा मित्र असून चीनवर उत्तर कोरियाचा व्यापार अवलंबून आहे. एकप्रकारे चीन ही उत्तर कोरियाची लाइफलाइनच आहे. चीनवर त्यांचा ९० टक्के व्यापार अवलंबून आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या चीनमध्ये मोठया प्रमाणावर कमी झाल्यामुळे उत्तर कोरिया चीन बरोबर पुन्हा व्यापार सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मागच्या काही महिन्यात कोरोना व्हायरसमुळे चीन आणि उत्तर कोरियामधील व्यापार मोठया प्रमाणावर कमी झाला होता.

Leave a Comment