करोना संकट, व्हाईट हाउस मध्ये झाला वैदिक शांतीपाठ


फोटो साभार द ट्रिब्युन
अमेरिकेत कोविड १९ चा प्रकोप अजूनही शांत होण्याची चिन्हे दिसत नसल्याने या विषाणूची तीव्रता कमी व्हावी यासाठी अन्य उपाय केले जात आहेत. याच्या अंतर्गत राष्ट्रीय प्रार्थना दिवशी अध्यक्षांच्या निवासस्थानी म्हणजे व्हाईट हाउसच्या रोझ गार्डन मध्ये न्यू जर्सीच्या स्वामी नारायण मंदिराचे पुजारी हरीश ब्रह्मभट यांच्याकडून वैदिक शांतीपाठ करविला गेल्याचे समजते. खुद्द ट्रम्प यांनी असा पाठ करविला जावा असा सल्ला संबंधिताना दिला होता असेही सांगितले जात आहे.

पूर्ण हिंदू रितीरिवाजानुसार केल्या गेलेल्या या शांतीपाठात संस्कृत श्लोक पठण करून ईश्वराकडे शांती साठी प्रार्थना केली गेली. करोना जागतिक महामारी आणि जगातील नागरिकांचे आरोग्य या साठी प्रार्थना केल्या गेल्या. पुजारी हरीश यांनी संस्कृत श्लोकांचा इंग्रजीत अर्थ सांगितला. ते म्हणाले ही यजुर्वेदातील वैदिक प्रार्थना पृथ्वी, आकाश, वृक्ष, पाणी, पिके याना शांती मिळावी म्हणून केली जाते. या कार्यक्रमाला अन्य धर्माचे नेते तसेच स्वतः ट्रम्प उपस्थित होते.

यावेळी आभार मानताना केलेल्या भाषणात ट्रम्प म्हणाले, अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रार्थना दिवशी हा कार्यक्रम होत आहे. अमेरिकेत आज कोविड १९ मुळे भीतीचे वातावरण आहे आणि या साथीशी मुकाबला म्हणजे एक प्रकारचे युध्द आहे. इतिहासात अश्या प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करताना अमेरिकेने धर्म, आस्था, प्रार्थना आणि ईश्वरीय शक्ती यावर विश्वास ठेवला आहे. यावेळी फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी कोविड १९ च्या साथीत आप्त गमावलेल्या कुटुंबियांविषयी सहानुभूती व्यक्त केली.

Leave a Comment