लॉकडाऊननंतर शाळांमध्ये लागू केला जाऊ शकतो ‘ऑड इव्हन’ फॉर्म्युला


मुंबई – देशासह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. पण या लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्वच उद्योगधंदे, व्यापार, प्रवासी वाहतूक, शाळा-महाविद्यालये बंद आहेत. तर देशातील विविध राज्यांनी आपल्या शिक्षण मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सर्वच शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, पण जून महिन्यात नियमित शाळा सुरू होतील. त्यामुळे कोरोनाचा लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा कशा पद्धतीने सुरू करता येतील यावर सध्या विचार सुरू आहे.

लॉकडाऊननंतर ‘ऑड इव्हन’ पद्धतीने शाळा सुरू करता येतील का? यावर विचार सुरू असून यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, शाळांमध्ये लॉकडाऊननंतर ‘ऑड इव्हन’ फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी ‘ऑड इव्हन’ फॉर्म्युल्यानुसार एकावेळेस एका वर्गात ५० टक्केच विद्यार्थी उपस्थित असतील. तर दुसऱ्या दिवशी इतर ५० टक्के विद्यार्थी शाळेत येतील. ‘ऑड इव्हन’ फॉर्म्युला शाळांसाठी लागू करता येईल का आणि तो कशाप्रकारे राबवता येईल यावर सध्या विचार सुरू आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, असे देखील सांगितले जात आहे. तसेच कुठल्या राज्यात, जिल्ह्यात हा फॉर्म्युला लागू करायचा यावरही चर्चा सुरू आहे.

लॉकडाऊन आणि शाळांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्याबाबत देखील विचार सुरू आहे. याबाबत एनसीईआरटीचे संचालक एच. सेनापती यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून तयार केलेल्या गाइडलाईन्सला अंतिम मंजुरी अद्याप मिळालेली नाही. आमचा प्रयत्न आहे की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, असे एक मॉडल तयार करायचे आहे. दरम्यान कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसल्याचे पहायला मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन शिथील करणे आणि शाळा महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. पण राज्य सरकार लवकरच यावर योग्य तो निर्णय घेईल.

Leave a Comment