देशात मागील चार दिवसात वाढले १०,००० कोरोनाबाधित रुग्ण


नवी दिल्ली – देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. पण केंद्राच्या या निर्णयामुळे देशात होणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव बऱ्याअंशी लगाम लागल्याचे चित्र आकडेवारीवरुन स्पष्ट झाले होते. पण आता एक धक्कादायक माहिती समोर आली असून मागील चार दिवसात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील चार दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या ४०,००० वरून थेट ५०,०००वर जाऊन पोहचली आहे. त्यातच महाराष्ट्राच्या दृष्टीने काळजीची बाब आहे, कारण मुंबईत यातील सर्वाधिक रुग्ण आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

शुक्रवारी (८ मे) देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५६ हजारांच्या पार पोहोचली असून केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत आहे. लॉकडाउनच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. गेल्या महिनाभराच्या आकडेवारीतून त्याचा अनुकूल परिणाम दिसून आला होता. कोरोनाच्या प्रसारावर परिणाम झाल्याचे निरीक्षण अभ्यासातून दिसून आले होते. पण मागील चार दिवसांच्या आकडेवारीमुळे केंद्र तसेच राज्य सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ३ ते ६ मे या चार दिवसांच्या कालावधीमध्ये उसळी मारल्याचे दिसून आले. तब्बल दहा हजार जणांना या चार दिवसांमध्ये कोरोना झाल्याचे समोर आल्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४०,००० वरून थेट ५०,००० पार झाली आहे. यात ३००० पेक्षा जास्त रुग्ण सात राज्यांमध्ये आढळून आले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचा या राज्यांमध्ये समावेश आहे.

Leave a Comment