चीनवर किम जोंग उनने उधळली स्तुतीसुमने


बँकॉक – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने कोरोना सारखी जागतिक महामारी नियंत्रणात आणण्यात यशस्वी ठरल्याबद्दल चीनचे अध्यक्ष शी जिंनपिंग यांचे कौतुक करीत एक वैयक्तिक संदेश पाठविला आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेने निरीक्षण केले असून उत्तर कोरियाची आर्थिक व्यवस्था या साथीच्या रोगामुळे आणखी बिघडली असल्याचे म्हटले आहे.

उत्तर कोरियाला आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे अमेरिकेच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय बंदीचा सामना करावा लागत आहे आणि यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. चीन हा उत्तर कोरियाचा सर्वात जवळचा सहयोगी आणि आर्थिक नाडी आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात किमने आपल्या संदेशात शी जिंनपिंगचे ‘अभिनंदन’ केले आणि या अभूतपूर्व जागतिक महामारीच्या विरोधातील युद्ध जिंकल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

हा संदेश कधी पाठविण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या आरोग्याबाबतच्या सुरु असलेल्या चर्चांनंतर तो नुकताच एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान जगासमोर आला होता. याबाबत माहिती देताना उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने सांगितले की, किम 20 दिवसांनंतर हजर झाला. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (केसीएनए) च्या मते, सनचियानमधील खत कारखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने किम जोंग उन उपस्थित होता.

हे ठिकाण उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. किमची बहीण किम यो जोंग देखील तेथे उपस्थित होती. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन याच्या आरोग्याबद्दल अनिश्चिततेची स्थिती होती. हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर त्याचा मृत्यू झाल्याचा दावा काही माध्यमांमध्ये करण्यात आला होता. तर किम कुठे आहे आणि त्याच्या तब्येतीबद्दल रहस्य कायम होते. याचे कारण तो 11 एप्रिल नंतर सरकारी माध्यमांमध्ये कुठेच दिसला नव्हता. तथापि, त्याच्या आगमनानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Leave a Comment