मुंबईत एकाच दिवशी आढळले ६९२ कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ११ हजारांवर


मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल दिवसभरात कोरोनाबाधित ६९२ रुग्ण आढळल्यामुळे मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार २१९ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे गुरुवारी २५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील कोरोना बळींची संख्या ४३७ वर पोहोचली आहे.

आज केंद्र सरकारचे पथक मुंबईत कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. केंद्राच्या या पथकाने मुंबईला पडलेला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभरात ६९२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले, तर २५ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ हजार २१९ वर, तर मृतांची संख्या ४३७ वर पोहोचली आहे. गुरुवारी मृत्युमुखी पडलेल्या २५ रुग्णांमध्ये १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश होता. तसेच यापैकी १३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तिघांचे वय ४० वर्षांहून कमी होते. तर १२ जण ६० वर्षांवरील होते. उर्वरित १० जण ४० ते ६० वयोगटातील होते.

गुरुवारी ५३८ कोरोना संशयित रुग्णांना मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. आतापर्यंत तब्बल १३ हजार २८७ कोरोना संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे १४८ जण बरे झाल्यामुळे त्यांना गुरुवारी घरी पाठविण्यात आले. बरे झाल्यामुळे रुग्णालयातून घरी पाठविण्यात आलेल्यांची संख्या दोन हजार ४३५ वर पोहोचली आहे.

आशियाखंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीला पडलेला कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होऊ लागला असून धारावीत काल दिवसभरात ५० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे धारावीमधील कोरोनाबाधितांची संख्या ७८३ वर पोहोचली आहे. तर दादर आणि माहीममध्ये प्रत्येकी दोन आणि पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दादर व माहीममधील कोरोनाबाधितांची संख्या अनुक्रमे ६६ व ९६ इतकी झाली आहे.

Leave a Comment