दुबईहून 182 भारतीयांची घरवापसी, तर मालदीवमधील 750 जण भारताच्या दिशेने रवाना


नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉडडाऊनमुळे अन्य देशात अडकलेले भारतीय मायदेशी परतले असून 182 भारतीय एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने कोची विमानतळावर पोहोचले आहेत. काल (गुरुवारी) संध्याकाळी वंदे भारत मिशन अंतर्गत दुबई विमानतळावरून पहिले विमान रवाना झाले आणि रात्री उशीरा कोची विमानतळावर दाखल झाले. 182 लोकांमध्ये 5 लहान मुलांचाही समावेश आहे. परदेशातून परतलेल्या भारतीयांसाठी विमानतळावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विमानतळावर सॅनिटायजेशन करण्यात आले आहे. येणाऱ्या लोकांचे थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येत आहे.

याबाबत माहिती देतान एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, एक विमान रात्री 10 वाजून 9 मिनिटांनी पाच लहान बाळं आणि 177 प्रौढ प्रवाशांना घेऊन कोची आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यांनी पुढे सांगितले की, एवढ्याच प्रवाशांसह आणखी एक विमान 10 वाजून 32 मिनिटांनी दुबईहून कोझिकोड येथे पोहोचले आहे.

तब्बल एक आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या वंदे भारत मिशन अंतर्गत सध्या 64 उड्डाने आणि काही नौदलाच्या युद्धनौकांमार्फत परदेशातील भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहेत. एका आठवड्यात 64 उड्डानांमार्फत देशातील 14.5 हजारांहून अधिक भारतीय घरी परतणार आहेत. सर्वात जास्त 15 फ्लाइट्स केरळमध्ये जाणार आहेत. तर दिल्ली-एनसीआर आणि तमिळनाडूसाठी प्रत्येकी 11, तेलंगणा 7 आणि गुजरातमध्ये 5 फ्लाइट्स पाठवण्यात येणार आहेत.

यावर गृह मंत्रालयाने सांगितले की, परदेशात विमानाच्या उड्डानाआधी प्रवाशांचे मेडिकल स्क्रिनिंग केले जाणार आहे. खोकला, ताप आणि सर्दीची लक्षणे ज्या भारतीयांमध्ये असतील. त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. तसेच या लोकांना भारतात आल्यानंतर 14 दिवसांसाठी रूग्णालयात किंवा इतर ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.

वंदे भारत मिशन परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सुरु करण्यात आले आहे. अशातच मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतूच्या नावाने नौदलातील दोन युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात आयएनएस जलाश्वतून जवळपास 750 भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात येणार आहे. जवळपास 900 किमीचा प्रवास करून हे जहाज कोची बंदरात दाखल होणार आहे. येथे या नागरिकांना उतरवल्यानंतर त्यांच्या राज्यांतील जिल्ह्यांत पोहोचवण्यात येणार आहे. या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी 40 डॉलर म्हणजेच, जवळपास 3 हजार 26 रुपयांचे सेवा शुल्क आकारण्यात आले आहे. 40 डॉलर प्रवास शुल्क न म्हणता, सेवा शुल्क म्हणण्याचे कारण म्हणजे, इतर वेळी मालदीव वरून कोचीला येण्याऱ्या लग्जरी क्रूज शिप्स सरासरी 32 हजार रुपयांचे प्रवास शुल्क आकारण्यात येते.

Leave a Comment