
जालना : देशासह राज्याभोवती कोरोनाचा फार्स आणखीनच जास्त आवळला जात असल्यामुळे देशभरात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण लॉकडाऊनमुळे देशभरातील अनेक मजूर अनेक राज्यांत अडकून पडले आहेत. अनेक मजुरांनी सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे पायी प्रवास करणे पसंत केले आहे. अशातच कोरोनाच्या संकटात मजुरांशी संबंधित एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. महाराष्ट्रातील औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 14 मजुरांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. या मजुरांना रेल्वे रूळावरून पायी जात असताना मालगाडीने धडक दिली. हा अपघात जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ घडला. जालन्यातून हे सर्व मजूर भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 14 मजुरांचा मृत्यू; तर दोन जण जखमी
जालन्यातील एका खाजगी कंपनीत सर्व मजूर काम करत होते. जालन्याहून रात्री भुसावळला निघाले असून ते तिथून आपल्या गावी छत्तीसगढला जाणार होते. लॉकडाऊनमुळे आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी रात्री पायी प्रवास सुरु केला होता. रस्त्यात थकल्यामुळे ते रेल्वे रूळावरच थांबले आणि तिथेच झोपून गेले. गाढ झोप लागल्यामुळे मालगाडी येत असल्याचे त्यांना समजले नाही. अशातच जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडीने या मजुरांना धडक दिली. एकूण 19 मजूर असून त्यातील 16 मजुरांना मालगाडीने धडक दिली. त्यामध्ये 14 मजुरांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. तर तीन मजूर बचावले आहेत.
