असा करोना, असे लॉकडाऊन आणि अशी लग्ने


फोटो साभार हायक्लिप आर्ट
जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या करोना कोविड १९ ने जग ठप्प केले, उद्योग बंद पडले, शाळा कॉलेज बंद झाली, प्रवास थांबले, हॉटेलिंग थांबले, मॉल, थियेटर्स बंद पाडली आणि लोकांना घरात डांबले. परंतु एका गोष्टीपुढे या करोनाला सपशेल माघार घ्यावी लागली. ती गोष्ट म्हणजे लग्ने किंवा विवाह. खरे तर हा लग्नाचा सिझन पण करोनानी त्यावर पाणी टाकायचा पर्यंत केला तरी जगाने कधी कल्पना केली नसेल अश्या अनोख्या पद्धतीने जगभरात विविध ठिकाणी अजब लग्ने साजरी झाली. अर्थात नेहमीची हौस मौज, मेजवान्या, पाहुणेरावळे, बँड बाजा, गाणी बजावणी यांच्या शिवाय पण तरीही आनंदात हे विवाह साजरे झाले.


सर्व फोटो साभार नवभारत टाईम्स
भारताचे उदाहरण प्रथम घेऊ. कारण भारतात लग्न हा केवळ एक उपचार नसतो तर तो भला मोठा सोहळा असतो. त्याची तयारी खूप आधीपासून सुरु केली जाते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती संपत नाही असा सोहळा. जोधपूर मध्ये लॉकडाऊन तीन मध्ये पूर्वी ठरलेलं एक विवाह पार पडला. त्याला पंडित आणि पाच लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजपचे नेते नीलम मुंदडा यांच्या मुलाच्या या लग्नात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नातेवाईक व्हिडीओ कॉल आणि अन्य ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून उपस्थित होते.


दुसरे असेच एक लग्न मध्यप्रदेशातील धार येथे झाले. या ठिकाणी लॉकडाऊन आणि सोशल डीस्टन्सिंग चे काटेखोर पालन केले गेले. ते इतके की वर आणि वधूने वरमाला घालताना लाकडी काठीचा वापर करून एकमेकांना माळ घातली.


लॉकडाऊन मधील तिसरे आगळे लग्न पुण्यात पार पडले. वधू डॉ. नेहा आणि वर इंजिनीअर आदित्यसिंह यांचा विवाह २ मे रोजी देहरादून येथे होणार होता. मात्र लॉक डाऊन मुळे सगळेच फिस्कटले. वधूचे आईवडील येऊ शकत नाहीत म्हटल्यावर पुणे पोलीस ठाण्यात विवाह पार पडला. त्याला गुरुजी आले होते आणि कन्यादान पोलिसांनीच केले.


जेरुसलेम येथे पार पडलेल्या या विवाहात ज्यू वधूने पांघरायची परंपरागत शाल घेतलेली बॅरन हिने यानीव जेंगर बरोबर विवाह शपथ घेतली. खासगी बागेत झालेल्या या विवाहाला अगदी मोजके पाहुणे होते. अमेरिकेच्या मेडिसन येथे अँड्र्यू व एमिली यांनी पार्क मध्ये विवाह केला पण फोटो घेताना फोटोग्राफर नसल्याने सेल्फ टायमर वापर करून फोटो काढले.


युक्रेन मधील कीव मध्ये लष्करी रुग्णालयात एक विवाह सोहळा पार पडला. हे मुख्य लष्करी हॉस्पिटल आहे. वर पूर्व भागात लढाई करताना जखमी झाल्याने येथे अॅडमीट होता. त्यामुळे त्याची वधू येथे आली आणि हा विवाह संपन्न झाला अर्थात पाहुण्याच्या अनुपस्थितीत. अमेरिकेतील ह्युस्टन येथे सोशल डीस्टन्सिंगचे पुरेपूर पालन करून प्रोटेक्टीव्ह मास्क लावून केवळ चार लोकांच्या उपस्थितीत वॉटर पार्क मध्ये ग्रॅब्रियल शम्स आणि डीएगो ग्रास्मो यांचा विवाह झाला.


सॅन फ्रान्सिस्कोच्या सिटी हॉल मध्ये होणारा कॅम गोमेज आणि लुईसा यांचा विवाह लॉकडाऊन मुळे होऊ शकला नाही पण त्या दोघांनी सोहळा रद्द झाला तरी विवाहाच्या आणाभाका घेतल्या आणि शहराची शान असलेल्या गोल्डन गेट ब्रीजवर फेसबुक लाईववरून झकास फोटो शेअर केले.


करोनाचा प्रसार जेथून झाला त्या चीन मधेही हंगजौ शहरात मा जोनुन आणि जँग यीतोंग यांनी पारंपारिक चीनी वेशात विवाह केला पण नातेवाईक, सगे सोयरे यांच्याऐवजी एक व्हिडीओ कॅमेरा आणून सर्व विवाह विधी ऑनलाईन केले.

Leave a Comment