आतापर्यंत जगभरातील 38 लाख 18 हजार 779 लोकांना कोरोनाचा संसर्ग


नवी दिल्ली – जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर कायम असून या देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 94,261 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 6,784 ने मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरातील 212 देशांमधील 38 लाख 18 हजार 779 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे यापैकी 2 लाख 64 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 लाख 98 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

अमेरिकेमध्ये जगभरातील एकूण कोरोनाच्या रूग्णांपैकी एक तृतियांश रुग्ण आहेत. तर अमेरिकेमध्ये एक चतुर्थांश कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेन कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला दुसरा देश आहे. जिथे 25,857 लोकांचा मृत्यू झाला असून 253,682 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांच्या संख्येत इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 29,684 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या 214,457 एवढी आहे. त्यानंतर यूके, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा यांसारखे देश सर्वाधिक प्रभावित आहेत.

जर्मनी, रूस, ब्राझीलसह नऊ देश असे आहेत, जेथील कोरोनाग्रस्तांचा आकडा एक लाख पार पोहोचला आहे. या यादीमध्ये आता इराणचाही समावेश झाला आहे. इराणमध्ये 1680 नवीन कोरोना बाधित आढळून आल्यामुळे तेथील एकूण रुग्णांची संख्या एक लाख पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन) असे आहेत, जिथे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 75 हजारांवर पोहोचली आहे. चीन कोरोना बाधित टॉप-10 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे.

Leave a Comment