मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी


मुंबई : महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत राज्यातील रुग्णांपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्यामुळे मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी नागरिकांना फक्त किराणा माल, दूध, भाजी, इतर अत्यावश्यक वस्तू, खाण्यापिण्याचे पदार्थ (अन्न-पाणी), औषधे यांची खरेदी करता येणार असून इतर वस्तू विकणाऱ्या दुकानांची परवानगी रद्द करण्यात आल्याचे आदेश दिले होते. पण आता या निर्देशात बदल करुन मुंबई महापालिका क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

कारण, जीवरक्षक वैद्यकिय उपकरणे, वैद्यकिय सुविधांसाठी आवश्यक आयटी सिस्टीम यांच्या बिघाडानंतर त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. त्यात इलेक्ट्रिक, हार्डवेअरची दुकाने बंद असल्याने अडचणी येत आहेत. म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये तिथल्या सहाय्यक आयुक्तांना एका रस्त्यावरील एकच इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरचे दुकान खुले ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई 3 मेनंतरही रेड झोनमध्ये असूनही लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यानुसार मुंबईतील काही अटींसह दुकाने आणि वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण वाईन शॉपच्या बाहेर मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तातडीने पुन्हा लॉकडाऊनच्या कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. 5 मे रोजी प्रवीण परदेशी यांनी परिपत्रक काढून मद्य आणि अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईचे आयुक्त परदेशी यांनी परिपत्रकात सुधार करुन नवीन परिपत्रक काढले आहे. आता अत्यावश्यक सेवेसोबतच इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरच्या दुकांनाना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Comment