डब्ल्यूएचओसोबत गुजरातची ही शहरे कोरोनावरील उपचार शोधण्यासाठी करणार काम

कोरोना व्हायरस महामारीवरील उपचार शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने होणाऱ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये गुजरातची 4 शहरे सहभागी होणार आहेत. या शहरांमध्ये अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोट यांचा समावेश आहे. या ट्रायलमध्ये रेमडेसिव्हर, लोपिनाव्हिर, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि इंटरफेरॉन या औषधांचा रुग्णांवरील परिणाम आणि कोरोना रुग्णांची काळजी याचे मानक निश्चित केले जातील.

गुजरातचे मुख्य आरोग्य सचिव जयंती रवी यांनी सांगितले की, क्लिनिकल ट्रायलमध्ये रुग्णांच्या आरोग्यात सुधारणा, मृत्यू दर, व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता आणि अन्य औषधांचा परिणाम याविषयी चर्चा केली जाईल.

क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी अहमदाबादवरून मेडिकल कॉलेज आणि सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल, वडोदरावरून गुजरात मेडिकल एज्यूकेशन अँड रिसर्च सोसायटी मेडिकल कॉलेज, सूरतचे न्यू सिव्हिल हॉस्पिटल आणि राजकोटच्या पंडित दीनदयाल उपाध्याय मेडिकल कॉलेजची निवड करण्यात आली आहे. या ट्रायलमध्ये जगभरातील जवळपास 100 देश सहभागी होणार आहेत.

आरोग्य संघटनेनुसार, ट्रायल दरम्यान कोरोना उपचाराच्या 4 पर्यायांवर त्यांच्या एकमेंकावरील प्रभावांच्या आधारावर अभ्यास केला जाईल. याचा उद्देश या चारही औषधांचा कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात उपयोग होतो का, याचा शोध घेणे आहे.

Leave a Comment