नवी दिल्ली : काल देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 42 हजार 533 वर पोहोचला असून त्यापैकी 29 हजार 453 अॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 11000 पेक्षा जास्त रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण 11707 रूग्ण बरे झाले आहेत आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 27.52 टक्के आहे.
देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 42 हजार पार, तर 27.52 टक्के रुग्ण कोरोनामुक्त
याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशभरात मागील 24 तासात 1074 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत आणि 2553 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना व्हायरस सारखे साथीचे आजार क्वचितच आढळून येतात. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन झाले नाही तर, कोरोना व्हायरसच्या संसर्ग आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा एकही रुग्ण ज्या जिल्ह्यांमध्ये आढळलेला नाही, तेथे कोरोनाचे रुग्ण आढळले तर लॉकडाऊनमध्ये दिलेल्या सवलती मागे घेण्यात येतील. कोरोना व्हायरस गुणात्मक प्रकारे वाढतो. परंतु लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे, असे लव अग्रवाल यांनी म्हटले.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रात आतापर्यंत 12 हजार 974 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 548 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात 1583, अंदमान-निकोबारमध्ये 33, अरुणाचल प्रदेशात 1, आसाममध्ये 43, बिहारमध्ये 503, चंदिगडमध्ये 94, छत्तीसगडमध्ये, 57, दिल्लीत 4549 आणि गोव्यात 7 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र, आता गोव्यातील सर्व रुग्ण बरे झाले आहेत.
याशिवाय गुजरातमध्ये 5428, हरियाणामध्ये 442, हिमाचल प्रदेशात 40, जम्मू-काश्मीरमध्ये 701, झारखंडमध्ये 115, कर्नाटकात 614, केरळमध्ये 500, लडाखमध्ये 41, मध्य प्रदेशात 2846, मणिपूरमध्ये 2, मेघालयामध्ये 12, मिझोरममधील 1, ओडिशामध्ये 162, पाँडेचरीमध्ये 8, पंजाबमध्ये 1102, राजस्थानमध्ये 2886, तामिळनाडूमध्ये 3023, तेलंगणामध्ये 1082, त्रिपुरामध्ये 16, उत्तराखंडमध्ये 60, उत्तर प्रदेशात 2645 आणि पश्चिम बंगालमध्ये 963 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.