कोणतीही लक्षणे नसताना या फॅक्टरीमधील 374 कर्मचारी कोरोना बाधित

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता अमेरिकेच्या मिसोरी येथील ट्रायम्फ फूड्स या मटन प्रोसेसिंग
फॅक्टरीमधील जवळपास 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली. यामध्ये 374 कर्मचाऱ्यांचे रिझल्ड पॉझिटिव्ह आले आहे. मात्र विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांमध्ये आजाराची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेली नाहीत.

ट्रायम्फ फूड्सच्या मिसोरी येथील फॅक्टरीमध्ये जवळपास 2,800 कर्मचारी काम करतात. म्हणजेच येथील 13 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कंपनीचे सीईओ मार्क कॅम्पबेल म्हणाले की, कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेल्फ आयसोलेट राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना नियमानुसार वेतन दिले जाईल. सोबतच त्यांना हँडसॅनिटायझर आणि मास्क दिले जाईल.

अमेरिकेतील मटन प्रोसेसिंग फॅक्टरी कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट्स ठरत आहेत. असे असले तरी राष्ट्रपती ट्रम्प यांनी या फॅक्टरी सुरू ठेवण्यास सांगितले आहे. मात्र यूनायटेड फूड अँड कमर्शियल वर्क्स इंटरनॅशनल यूनियनने मात्र याला विरोध केला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी काहीही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. संघटनेच्या 6,500 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment