कोरोनाच्या भयाण संकटात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी झापले


नवी दिल्ली : जगभरातील 212 देश कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरस विरोधात लढाई लढत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या महामारीविरोधात लढण्याच्या पद्धतीसंदर्भात नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM) वर्च्युअल समिटमध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना जगभरातील अनेक देशांसोबत संवाद साधताना पाकिस्तानवरही टिकास्त्र डागले आहे. मोदी पाकिस्तानवर निशाणा साधत म्हणाले की, कोरोनाच्या संकटाचा देश सामना करत आहे, पण काही लोक असेही आहेत, जे दहशतवादाचा व्हायरस पसरवत आहेत. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींसोबत या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेदेखील सहभागी झाले होते.

मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM) वर्च्युअल समिटमध्ये म्हणाले की, भलेही कोरोना व्हायरसचा सामना जग करत आहे. पण दहशतवाद, फेक न्यूज, अफवा आणि समाजाला फोडण्यासाठी व्हिडीओसारखे काही घातक व्हायरस काही लोक पसरवत आहेत. संपूर्ण जगाला भारतीय सभ्यता ही एक कुटुंब मानते. आमच्या देशांतील नागरिकांची आम्ही काळजी घेत असतानाच, इतर देशांनाही मदत करत आहोत.

मोदींनी समिटमध्ये बोलताना कोणाचेही नाव न घेता केलेल्या टीकेचा ओघ पाकिस्तानकडेच होता. जम्मू-काश्मिरमध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत 5 भारतीय सैनिक शहीद झाले. त्याचबरोबर काश्मिर खोऱ्यात भारताबाबत पाकिस्तानकडून अनेक खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्यात येत असून सोशल मीडियाच्या आधारावर इन्फॉर्मेशन वॉरही सुरू आहे.

मोदी पुढे म्हणाले की, लोकशाही, शिस्त आणि निर्णायकता यांचा एक जन आंदोलन उभे करण्यासाठी कशाप्रकारे संगम होऊ शकतो, हे आपण या संकटाच्या काळात पाहीले आहे. महत्त्वाचे म्हणजे, 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला आहे. लोकांनी घरगुती आयुर्वेदिक गोष्टींचा उपयोग केला तर त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते, असेही मोदी या समिटमध्ये बोलताना म्हणाले.

आम्ही कोरोनाचा सामना करण्यासाठी आमच्या जवळच्या देशांशी समन्वय साधण्यास महत्व दिले. अनेक देशांशी आम्ही भारतीय वैद्यकीय कौशल्यावर ऑनलाइन ट्रेनिंगदेखील सुरू केली आहे. आम्हाला गरज असतानाही आम्ही 123 हून अधिक भागीदारी असलेल्या देशांना वैद्यकीय पुरवठा निश्चित केल्याचेही मोदी म्हणाले.

समिटमध्ये पुढे बोलताना मोदी म्हणाले की, भारताने कोरोनाच्या संकटात फक्त स्वतःचीच नाही तर इतरांचीही काळजी घेतली आहे. विशेष म्हणजे, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या गरजांसोबतच जगभरातील 123हून अधिक देशांना औषधे पुरवली. यामधील एकूण 53 देश नॉन अलायन मुव्हमेंटमधील (NAM) आहेत.

Leave a Comment