विदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना ‘एअरलिफ्ट’ करणार सरकार

कोरोना व्हायरस महामारीमुळे हजारो भारतीय परदेशात अडकले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी सरकार विमाने आणि जहाज पाठवणार आहेत. हे जगातील सर्वात मोठे नागरिकांना परत आणण्याचे मिशन ठरणार आहे. जवळपास 13 देशात अडकलेल्या 14,800 भारतीयांना 64 विमानांद्वारे पहिल्या आठवड्यात परत आणले जाणार आहे. यासाठी यूरोपमधून येणाऱ्या नागरिकांकडून 50 हजार रुपये, तर अमेरिकेतील नागरिकांकडून 1 लाख रुपये घेण्यात येणार आहेत. याशिवाय पश्चिम आशिया आणि मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठीही नौदल युद्धनौका पाठवल्या जातील.

7 मे रोजी पहिल्या दिवशी 10 विमानांद्वारे 2300 भारतीयांना मायदेशी आणले जाईल. अमेरिका, फिलिपाईन्स, सिंगापूर, बांगलादेश, यूएई, ब्रिटन, सौदी अरेबिया, कतार, सिंगापूर, ओमन, बहरीन आणि कुवैत या देशांमधून नागरिकांना आणले जाईल. यानंतर 2050 भारतीयांना चेन्नई, कोच्ची, मुंबई, अहदाबाद, बंगळुरू आणि दिल्ली येथे 9 देशांमधून आणले जाईल. तिसऱ्या दिवशी देखील मध्य पूर्व, युरोप, दक्षिण पूर्व आशिया आणि अमेरिकेतील 13 वेगवेगळ्या देशातून तेवढ्याच भारतीयांना मायदेशी आणले जाईल. योजनेच्या चौथ्या दिवशी 8 देशांमधून 1850 भारतीयांना परत आणले जाईल.

सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत प्रत्येक विमानात 200 ते 300 प्रवासी असतील. प्रवासाला सुरूवात करण्याआधी प्रवाशांना आजाराची काही लक्षणे असल्यास त्याची माहिती द्यावी लागेल. ज्यांना कोणतीही लक्षणे नसतील, अशांनाच परत आणले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
तसेच, आयएनएस जलाश्व, आयएनएस शार्दुल आणि आयएनएस मगर या तीन जहाज मालदीव आणि यूएईमध्ये अडलेल्या भारतीयांना आणण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. यूएईतून भारतात परतण्यासाठी 2 लाख भारतीयांनी अर्ज केला आहे. गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी लोकांना सर्वात प्रथम प्राथमिकता देण्यात येईल.

Leave a Comment