दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा साधेपणानेच साजरा करा


मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुणे ही शहरे केंद्र असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गणेशोत्सवात पुण्यातील मानाचे गणपती आणि मंबईतील मोठ्या गणेशमूर्ती आणि आकर्षक देखावे हे आकर्षण असते. गणपती दर्शनासाठी येथे अनेक भाविक त्याठिकाणी गर्दी करतात. पण राज्यावर सध्या असलेले कोरोनाचे सावट पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे अनेकांच्या मनात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव गणेशोत्सवापर्यंत कमी होऊन, राज्य कोरोनामुक्त होणार असा विश्वास सर्व भाविकांसोबतच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला देखील असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सव साजरा होईल असा आत्मविश्वास सर्वच जण व्यक्त करत आहेत. पण यंदा दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असून सर्व गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याची तयार करा, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी सांगितले आहे. पण यंदाचा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात न करता अत्यंत साधेपणाने साजरा करा, असेही त्यांनी सांगितले आहे. कारण कोरोनानंतरही आपल्यापैकी प्रत्येकाला काळजी घेणे आवश्यक आहे.

नरेंद्र दहीबावकर यांनी यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले की, देशात काही वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली होती. लोकांना त्यानंतरही आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून साधेपणाने 11 दिवस गणेशोत्सव साजरा केला होता. त्यामुळे त्यांनी गणेशोत्सव मंडळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ते याबाबत पुढे बोलताना म्हणाले की, मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवा दरम्यान गर्दी होत असल्याने लोकांचा तसेच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. गणेशोत्सव मंडळांनी संकटाच्या काळात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच काम केले आहे. पोलीस तसेच पालिकेवर गेल्या काही दिवसांपासून मोठा ताण असल्यामुळे गणेश मंडळे यावेळीही आपली मदतीची परंपरा कायम ठेवणार आहेत. त्याचबरोबर लोकांना कमी गर्दी करण्याचे आवाहन करण्यात येणार असून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

Leave a Comment