करोनापाठोपाठ अमेरिकेवर घोंगावतेय आणखी एक संकट


फोटो साभार कॅच न्यूज
जगभर फैलावलेल्या करोनाचा सर्वाधिक वाईट परिणाम अमेरिकेवर झाला असतानाच आता आणखी एका आगंतुक पाहुण्याचे संकट अमेरिकेवर घोंगावू लागले आहे. या नव्या पाहुण्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या नुकसानीला अमेरिकेला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला गेला आहे.

अमेरिकेच्या काही भागात विशेषतः वेस्ट कोस्ट मध्ये मधमाशी सारखी दिसणारी पण तिच्यापेक्षा आकाराने पाचपट मोठी आणि अतिशय विषारी होर्नेट माशी आढळली आहे. या माश्या इतक्या विषारी आहेत की त्या चावल्या आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर माणसाचा जीव जाऊ शकतो. जगभरात दरवर्षी सरासरी ६० लोकांचा या माश्यांनी चावे घेतल्याने मृत्यू होतो असे आकडेवारी सांगते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या माश्या आशियातील अति पाउस आणि आर्द्रता असलेल्या जंगलात सापडतात. व्हिएतनाम मध्येही त्या आढळतात पण अमेरिकेत कधी दिसल्या नव्हत्या.

या माशीचे पंख तीन इंचापेक्षा मोठे असतात आणि तिच्यामध्ये न्यूट्रोक्सीन नावाचे जहाल विष असते. काही दिवसापूर्वी या माश्या दिसताच कॉनरॉड बेब्य्रू नावाच्या माणसाला या माशांचे पोळे नष्ट करण्यासाठी पाठविले गेले. त्याने द मिररला दिलेल्या माहितीनुसार त्याला अनेक माश्यांनी डंख केला पण तो पूर्ण तयारीनिशी गेला होता आणि वेळेवर त्याने औषधे घेतल्याने त्याचा जीव बचावला. मात्र अजूनही तो व्यवस्थित चालू शकत नाही.

न्यूयोर्क टाईम्सच्या बातमीनुसार कॉनरॉडला माशी चावताच त्याच्या अंगाची खूप आगआग झाली पण वेळेवर त्याने उपचार केल्याने धोका टळला. गेल्या महिन्यात ब्रिटन मध्येही या माश्या आढळल्या होत्या आणि त्यांचा निपटारा करण्यासाठी त्या देशाला ७० कोटी रुपये खर्च आला होता. अमेरिकेत हे संकट आले तर त्यानाही असाच प्रचंड खर्च करावा लागेल असे सांगितले जात आहे. तेथील नागरिक हे दैवी संकट मानत असून देवाने दिलेली आणखी एक शिक्षा अशी भावना व्यक्त करत आहेत.

Leave a Comment