पुण्यातील हे आहेत 69 प्रतिबंधित क्षेत्र


पुणे : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील मुंबई आणि पुणे जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आजपासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु होत असल्यामुळे राज्यातील रेड झोन असलेल्या पुण्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

शहरातील एकूण 69 प्रतिबंधित क्षेत्र पुणे महानगर पालिकेने घोषित केले आहेत. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र आणि विनाप्रतिबंधित क्षेत्राबाबत मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी नवे आदेश काढले आहेत. नव्या आदेशानुसार पुण्यातील जाहीर करण्यात आलेल्या 69 प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध यापुढेही कायम राहतील. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी शासन निर्णयानुसार सवलती मिळणार आहेत.

सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत शहरातील विनाप्रतिबंधित क्षेत्रा मधील दुकाने चालू ठेवण्यास पोलिसांची परवानगी दिल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिले आहे. मात्र, एका गल्लीत फक्त 5 दुकाने सुरू ठेवता येतील, अशी अट ठेवण्यात आली आहे. तसेच नवीन ऑर्डरमध्ये वाईन शॉपबाबतचा उल्लेख मात्र टाळण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील मद्यविक्रीबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. शासन निर्णयानुसार मद्यविक्रीला परवानगी असली तरी पुणे पोलिसांकडून अद्याप कोणतेच आदेश देण्यात आलेले नाहीत.

पुण्यात नॉन कंटेनमेंट परिसरात सवलती मिळाल्या असल्या तरी प्रतिबंधित भागातील नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी कायम राहील. थोडक्यात इकडून तिकडे आणि तिकडून येजा करता येणार नाही. तसेच ग्रीनमध्येही रात्रीची संचारबंदी यापुढेही कायम असणार आहे. लहान आणि वयोवृद्धांनाही वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. थोडक्यात पुणेकरांनी ‘सातच्या आत घरात’ यावे, असे नवे आदेशच पुणे पोलिसांनी काढले आहेत.

Leave a Comment