..तर काँग्रेस पक्षाकडून करण्यात येईल मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च – सोनिया गांधी


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाउनमध्ये सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून देशभरात लॉकडाउन लागू झाल्यामुळे देशातील अनेक राज्यात इतर राज्यातील मजूर आणि कामागर ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या या परिस्थितीला मोदी सरकारला जबाबदार धरले आहे.

लॉकडाउनच्या भूमिकेबद्दल सोनिया गांधी यांनी एक पत्रक स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालय जर पंतप्रधान कोरोना फंडात 151 कोटी रुपये देऊ शकते. तर या आपत्तीच्या काळात मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा का देऊ शकत नाहीत? म्हणूनच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने निर्णय घेतला आहे की, प्रत्येक गरजू मजूर आणि कामगार यांच्या घरी परतण्यासाठी कॉंग्रेसमधील प्रत्येक तुकडी रेल्वे प्रवासाची तिकिटांचा खर्च स्वतः उचलेल आणि त्या संदर्भात आवश्यक ती पावले उचलतील, अशी घोषणा सोनिया गांधी यांनी केली.


लॉकडाउन करण्याचा निर्णय फक्त चार तासांची मुदत देऊन घेण्यात आल्यामुळे लाखो मजूर आणि कामगार आपल्या घरी पोहचू शकले नाही. जेव्हा देशाची 1947 मध्ये फाळणी झाली होती, त्यानंतर आज लाखो मजूर आणि कामगार हजारो किलोमीटर प्रवास पायपीट करून घरी पोहोचत असल्याचे भयावह चित्र पाहण्यास मिळाले. त्यांच्याकडे रेशन नव्हते आणि पैसेही नव्हते. पण, तरीही हे लोक आपल्या घराकडे निघाले. त्यांचा हा प्रवास मनाला भीती घालणार आहे, अशी भावना सोनिया गांधींनी व्यक्त केली.

पण देशाचे आणि सरकारचे आज कर्तव्य काय आहे? लाखो मजूर आज आपल्या गावाकडे निघाले आहे, कुणाला खायाला नाही, कुणाकडे पैसे नाही. पण, अशाही परिस्थितीत मोदी सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या प्रवासाचे पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला असून त्यावर सोनिया गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे.

परदेशात जेव्हा लोक अडकले होते, त्यांना विमानाने निशुल्क घरी परत आणण्यात आले. गुजरातमध्ये जेव्हा एका कार्यक्रम झाला त्याच्यासाठी सरकारच्या तिजोरीतून 100 कोटी खर्च करण्यात आले होते. मग रेल्वे मंत्रालय हे पंतप्रधान फंडात 151 कोटी रुपये देऊ शकते, तर अशा बिकट परिस्थितीत मजुरांना रेल्वे प्रवास मोफत का देऊ शकत नाही? असा सवाल सोनियांनी उपस्थितीत केला आहे.

मजुरांसाठी या प्रकरणी काँग्रेसने वेळोवेळी आवाज उठवला होता. परंतु, मोदी सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने याकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे काँग्रेस पक्षातील प्रत्येक गट हा गरजू मजूर आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या रेल्वे प्रवासाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याची घोषणा सोनिया गांधींनी केली.

Leave a Comment