पुणे – पुण्यातील परिस्थिती जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे चिंताजनक बनली असून पुण्यातील वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) पुण्यातील ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपीस परवानगी दिली आहे.
‘आयसीएमआर’कडून ससून रुग्णालयाला ‘प्लाझ्मा थेरेपी’ची परवानगी
पुण्यात पाऊल ठेवत कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यानंतर हळूहळू मुंबई, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले. पण, पुण्यातील परिस्थिती तोपर्यंत चिंताजनक वळणावर पोहोचली होती. पुणे सध्या रेड झोनमध्ये आहे. येथील अनेक परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी फायदेशीर ठरत असल्याचे वैद्यकीय पाहणीतून समोर आल्यामुळे ही थेरेपी उपचारासाठी आयसीएमआरने वापरण्यास सुरूवात केली. ही थेरेपी देशातील अनेक ठिकाणी वापरली जात असून, मुंबईत प्लाझ्मा थेरेपी यशस्वी ठरली आहे.
पुणे जिल्हा प्रशासनानंही प्लाझ्मा थेरेपीचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर वापर करण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्याचबरोबर प्लाझ्मा थेरेपीची कोरोनाग्रस्त रुग्णांवर चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. काही आठवड्यांपूर्वी केली होती. प्रशासनाची मागणी मान्य करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपी करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) परवानगी दिली आहे. ससूनच्या प्रशासनाला तसे पत्र मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
आतापर्यंत पुण्यातील १०३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यातील ६८ जण ससूनमध्ये दाखल होते. प्रशासनाला अनेक परवानग्या मिळाल्या आहेत. वैद्यकीय चाचण्या नियमानुसार सुरू करण्यात येतील, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्ती, ज्या प्लाझ्मा देण्यास तयार आहेत. त्यांची यादी महापालिकेकडून मागविली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा प्लाझ्मा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.