मागील काही दिवसांमध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका 40 वर्षीय उद्योगपतीला देखील ऑनलाईन शॉपिंगच्या नादात तब्बल 2.25 लाख रुपयांना गंडा बसला आहे.
2 शेवच्या पाकिटांच्या नादात व्यक्तीने गमावले चक्क 2.25 लाख रुपये
व्यक्तीने ऑनलाईन सामान मागवले होते. मात्र त्यांना 400 रुपये किंमतीची 2 शेवची पाकिटे मिळाली नाहीत. यामुळे व्यक्तीने ऑनलाईन हेल्पलाईन नंबर सर्च केला व बँकची माहिती शेअर केल्यानंतर 2.25 लाख रुपये गमावावे लागल्याची माहिती समोर आली आहे..
बोरिवली पोलिसांनुसार, त्यांना 2 तारखेला या संदर्भात तक्रार मिळाली असून, एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी व्यक्तीने ऑनलाईन किराणा वेबसाईटवरून सामान मागवले होते. त्यांना सर्व सामान मिळाले, मात्र 400 रुपये किंमतीची शेवची पाकिटे मिळाली नाहीत.
सामान न आल्याने उद्योगपतीने गुगलवर वेबसाईटचा हेल्पलाईन नंबर सर्च केला. मात्र त्यांना सायबर ठगांनी अपलोड केलेला हेल्पलाईन नंबर मिळाला. या ठगांनी त्यांना बँक अकाउंट नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि एटीएमचा तीन आकडी सीव्हीव्ही क्रमांक मागितला. हॅकर्स त्यांना एक लिंक देखील दुसऱ्या मोबाईलवर पाठविण्यास सांगितली. उद्योगपतीने यूपीआय पिन आणि ओटीपी शेअर केल्यानंतर या ठगांनी त्यांच्या खात्यातून 2 तासात 2.25 लाख रुपये काढून घेतले.
