आयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आयएफएससी गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती केली आहे. मुंबईतच आयएफएससी सेंटर ठेवा. गुजरातला हे सेंटर हलविल्यास देशाचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि मुंबईची पतही आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरेल, असा इशारा यावेळी शरद पवार यांनी दिला.


देशातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी आयएफएससी प्राधिकरण ही युनिफाइड एजन्सी आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक भांडवल यादृष्टीनेही आयएफएससीला स्थानांतरित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आणि स्थान असल्याचेही शरद पवार म्हणाले. आयएफएससी प्राधिकरण गुजरात येथे नेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (२ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने मुंबईच्या ऐवजी गुजरातमधील गांधीनगर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) प्राधिकरण स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध करून पत्राद्वारे शरद पवार यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. सर्व व्यापारी समुदाय, बँकर्स आणि इतर वित्तीय संस्था यांची सर्वसाधारण मानसिकता लक्षात घेता मुंबईत एकीकृत प्राधिकरण स्थापित करणे ही स्वाभाविक निवड ठरेल. पण देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराच्या असलेल्या मोक्याच्या स्थानाला व महत्त्वाला या उपरोक्त निर्णयामुळे धक्का देण्याची भूमिका घेतली गेली आहे. या धक्कादायक निर्णयामुळे जगभरातील अनेक वित्तीय संस्थासुद्धा मागे हटतील अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment