कोरोना वॉरिअर्सना तिन्ही सैन्यदलाची मानवंदना, फायटर विमानातून होणार पुष्पवृष्टी


नवी दिल्ली : आज तिन्ही सैन्य दलाकडून कोरोना व्हायरसविरोधात लढा देणाऱ्या योद्धांना मानवंदना देण्यात येणार आहे. जीवघेण्या कोरोनाविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि माध्यमांचे प्रतिनिधी दोन हात करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत असल्यामुळे या कोरोना वॉरिअर्संना तिन्ही दलांकडून विशेष मानवंदना देण्यात येणार आहे.

फ्लाय पास्टचे इंडियन एअर फोर्सतर्फे आयोजन करण्यात आले असून काश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि आसामपासून ते कच्छपर्यंत असे दोन फ्लायपास्ट करण्यात येणार आहे. भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा यामध्ये समावेश असणार आहे. तर समुद्रातूनही भारतीय नौदलांकडूनही या योद्ध्यांना सलामी देण्यात येणार आहे. यावेळी 24 बंदरांवरील जहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे. गुजरातच्या पोरबंदर, मुंबई, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकता येथील बंदरावर सायंकाळी 7 वाजता आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल.

लष्कराकडून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाबाहेर विशेष बॅण्डचे वादन होणार आहे. सकाळी 10 वाजता एम्स, नरेला क्वारंटाईन सेंटर आणि ब्रिगेड हॉस्पिटलला सकाळी 10.30 वाजता बॅण्डचे वादन करण्यात येणार आहे.

Leave a Comment