लॉकडाउनमध्येच होऊ शकतात लग्नाळूंचे लग्न; पण या अटी पाळणे गरजेचे


नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने देशात लागू असलेला लॉकडाऊन पुन्हा दोन आठवड्यांनी सशर्त वाढवण्याचा निर्णय घेतला. चार मे पासून १७ मे पर्यंत तिसऱ्या लॉकडाउनचा कालावधी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये देशाची विभागणी करून जनजीवन सुरळीत करण्यासाठी नवीन नियमावली जारी करत देशातील नागरिकांना काही अंशी सूट दिली आहे.

ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमधील प्रमुख आर्थिक व्यवहारांना सशर्त परवानगी देताना मात्र रेड झोनमध्ये निर्बंध वाढवण्यात आले आहेत. त्याचबरोबर देशभरात फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क असणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवताना अनेक गोष्टींमध्ये सूट देखील दिली आहे. यामध्ये लग्नाळूंच्या रखडलेल्या लग्नांचा देखील विचार करण्यात आला आहे.

लग्नांसाठी उत्सुक असणाऱ्यांना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सशर्त सूट देण्यात आली आहे. यातील महत्वपूर्ण अट म्हणजे दोन्ही कुटुंबाकडून एकूण ५० व्यक्तींनाच विवाह सोहळ्यात उपस्थित राहता येईल. तसेच सर्वांना फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क बंधनकारक आहे. तर अंत्यविधीसाठी अगोदरप्रमाणेच केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

Leave a Comment