जाणून घ्या ४ मेपासून कोणत्या झोनमध्ये मिळणार किती सूट


नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊनच्या कालावधीत १७ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. देशात ४ मेपासून तिसरा लॉकडाऊन सुरु होणार असून जो मागील २ लॉकडाउनपेक्षा थोडा वेगळा असणार आहे. देशातील राज्यांमधील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आल्यामुळे झोननुसार या लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. रेड झोनमधील नागरिकांसाठी लॉकडाऊनचे नियम अधिक कठोर असणार आहेत. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सूट देण्यात येणार आहे.

जिथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही किंवा गेल्या २१ दिवसांत कोणताही नवीन रुग्ण तेथे सापडलेला नाही अशा जिल्ह्याची ग्रीन झोनमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्याच वेळी वेगवेगळे परिमाण रेड झोनसाठी लावण्यात आले आहेत. दरम्यान, रेड किंवा ग्रीन झोनमध्ये जे जिल्हे नाहीत अशा जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये टाकण्यात आले आहे.

देशभरातील १३० जिल्हे रेड झोन, २८४ जिल्हे ऑरेंज झोन आणि ३१९ ग्रीन झोन म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घोषित केले आहेत. ज्या जिल्ह्यात २८ किंवा १४ दिवसांपर्यंत जर एकही रुग्ण आढळून आला नाही तर तो जिल्हा ग्रीन झोनमध्ये येऊ शकतो. लॉकडाउन ३ मध्ये झोननुसार सूट आणि निर्बंध लागू होतील.

देशभरातील प्रत्येक झोनमध्ये यावरील बंदी पुढे ही कायम असेल

 • विमान, रेल्वे, मेट्रो आणि रस्त्याद्वारे आंतरराज्य प्रवासी बस, शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था, हॉटेल रेस्टॉरंट्ससह आतिथ्य सेवा हे बंद राहतील.
 • चित्रपटगृहे, मॉल, जिम, क्रीडा संकुल इत्यादी ठिकाणे बंद राहतील. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतर प्रकारचे मेळावे आणि पूजा मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यावर बंदी
 • लोकांना सर्व अनावश्यक कामांसाठी संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत बंदी असणार आहे.
 • सर्व झोनमध्ये ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, आजारी लोक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना आवश्यक गरजा आणि आरोग्याच्या हेतूशिवाय घरीच रहावे लागेल.
 • सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि वैद्यकीय दवाखाने चालवण्यास परवानगी आहे, तथापि कंटेनमेंट झोनमध्ये याला परवानगी नाही. वस्तूंच्या पुरवठ्यास परवानगी दिली जाईल आणि वस्तू पुरवठा करणारी वाहतूक कोणतेही राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश रोखणार नाही.

रेड झोनसाठी लागू असलेली नियमावली

 • रेड झोनमधील रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी किंवा कॅब, आंतरजिल्हा किंवा जिल्ह्यात बस चालविणे, सलून, स्पा यावर बंदी कायम राहिल.
 • परवानगी दिलेल्या कामांसाठी वैयक्तिक चारचाकी वाहने (ड्रायव्हर व्यतिरिक्त दोन प्रवासी) आणि दुचाकी (एकट्या) यांना परवानगी दिली जाईल.
 • शहरी भागातील अनावश्यक वस्तूंची दुकाने, मॉल, बाजारपेठ आणि परिसर उघडण्यास परवानगी नाही.
 • शहरी भागात एकल दुकाने, निवासी भागातील दुकाने उघडण्यास परवानगी असेल. यामध्ये आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंची विक्री असा फरक केला जाणार नाही.
 • विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड), निर्यात केंद्रीत केंद्रे (ईओयू), औद्योगिक क्षेत्रे आणि औद्योगिक शहरे यासारख्या शहरी भागात स्थित औद्योगिक प्रतिष्ठानांच्या मर्यादित प्रवेशासह परवानगी देण्यात आली आहे.
 • आवश्यकतेनुसार खाजगी कार्यालये ३३ टक्के क्षमतेसह काम करू शकतील आणि उर्वरित कर्मचारी घरातूनच काम करू शकतील.
 • सर्व सरकारी कार्यालयांमध्ये उपसचिव स्तराच्या वरील अधिकारी काम करतील तर एक तृतीयांश कर्मचारी कार्यालय सांभाळतील.
 • केवळ मर्यादित गोष्टींसाठी एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात व्यक्ती आणि वाहनांना परवानगी दिली जाईल. या व्यतिरिक्त, ग्रीन झोनमधील प्रतिबंध असलेल्या गोष्टी वगळता सर्व गोष्टींना परवानगी दिली जाईल. येथे बसेस धावू शकतील पण यामध्ये ५० टक्के प्रवासी असणे गरजेचे आहे.

दिलेल्या सवलती दरम्यान ‘या’ गोष्टीचे करावे लागणार पालन

 • आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅप कंटेनमेंट झोनमध्ये राहणार्‍या लोकांसाठी बंधनकारक आहे.
 • लॉकडाऊन दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू, मद्यपान, गुटखा, तंबाखू इत्यादीचे सेवन करण्यास परवानगी नाही. तथापि, ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर निश्चित केल्यानंतरच दारु, पान, तंबाखूच्या विक्रीस परवानगी असेल आणि दुकानात एकावेळी पाचपेक्षा जास्त लोक नसतील. याची काळजी घ्यावी लागणार आहे.
 • सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.
 • लग्नाच्या कार्यक्रमांना आमंत्रित केलेले अतिथी ५० पेक्षा जास्त असता कामा नये.
 • अंत्यसंस्कार जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत केले जातील
 • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडात्मक गुन्हा असणार आहे.
 • लॉकडाउनचे पालन न केल्यास एका वर्षाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

Leave a Comment