मुंबई – महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली असून राज्यभरात आजचा हिरक महोत्सव साजरा करायचा असे आपण सर्वांनीच ठरवले होते. पण कोरोनामुळे आपला नाईलाज आहे. आज सकाळी मी जेव्हा त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलो तेव्हा मास्क लावला होता. संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे पूर्ण झाली होती त्यावेळीचा सोहळा केवढ्या थाटा पार पडला ते आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. १ मे २०१० रोजी लाखो नागरिक जमले होते. शिवसेना प्रमुख, बाबासाहेब पुरंदरे आणि लतादीदी उपस्थित होत्या. लतादीदींनी बहु असोत सुंदर हे १९६० मध्ये गाणे गायले होते तेच गाणे पुन्हा त्यांनी पुन्हा महाराष्ट्र स्थापनेच्या ५० व्या वर्षी देखील गायले होते. आज त्याच मैदानामध्ये आपण कोरोनाग्रस्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले.
कोरोनाची साखळी तोडण्यात महाराष्ट्र बऱ्याच अंशी यशस्वी
कोरोनाविरोधातील लढाई महाराष्ट्र खंबीरपणे लढत आहे. कित्येक वर्षांच्या महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या गाथा आहेत. महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. अंधश्रद्धा निर्मूलन, क्रांतिकारी विचार हे सगळे रुजवणारा आणि जपणारा असा आपला महाराष्ट्र असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. कोरोनाविरोधातील लढाईत माझ्यासोबत आपण देखील जिंकणार हे मला चांगलेच माहित आहे, कारण महाराष्ट्रातील जनता माझ्या सोबत आहे. कोरोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यात आपण बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मी लॉकडाउनपेक्षा थोडा वेगळा शब्द वापरेन, जो सिंगापूरच्या पंतप्रधानांनीही वापरला होता तो म्हणजे सर्किट ब्रेकर्स अर्थात हे गतिरोधक आहेत. व्हायरसची श्रृंखला तोडण्यासाठी हे गतिरोधक आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आत्ता जी बंधने आहेत त्यात ३ मे नंतर आपण बरीच मोकळीक देणार आहोत. पण झुंबड उडाली आणि सावधगिरी बाळगली गेली नाही तर ही बंधने पुन्हा घालावी लागतील. आपण सर्वच कोरोनाविरोधातील हे युद्ध जिंकणार आहोत, जी साथ तुम्ही सगळ्यांनी दिली ती यापुढे देखील अशीच राहू द्या, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.