अखेर केंद्र सरकारची ‘स्पेशल ट्रेन’ चालवण्यास मंजुरी


नवी दिल्ली – देशात डोकेवर काढणारा कोरोना व्हायरसवर हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे चित्र असल्यामुळे केंद्र सरकारने आता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता आणण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय गृह विभागाने आज (1 मे) देशात अडकलेल्या मजुर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य लोकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी भारतीय रेल्वे सुरू करण्याची मंजुरी दिली आहे. दरम्यान कोरोनाची सद्यस्थिती पाहता त्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्व जारी केली जाणार आहेत. त्यासाठी लवकरच तिकीट बुकिंग आणि अन्य सूचना जारी केल्या जाणार आहेत.


आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून स्पेशल ट्रेन्स चालवण्यासाठी नोडल ऑफिसर जबाबदारी सांभाळेल. दोन राज्यांमधील, केंद्रशासित प्रदेशांमधील हा ऑफिसर समन्वयक असेल. याप्रवासामध्येही किती जणांना परवानगी दिली जाऊ शकते, रेल्वे स्थानकावर, ट्रेनमध्ये सुरक्षेचे नियम काय असतील? सोशल डिस्टन्सिंग कसे पाळले जाऊ शकते? याची सुस्पष्ट नियमावली दिली जाणार आहे. दरम्यान दोन्ही राज्यांची गरज पाहून या स्पेशल ट्रेन्स एका स्थानकातून दुसर्‍या स्थानकात चालवली जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

आज केंद्र सरकारने दिलेल्या माहितीमुळे स्थलांतरित मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. दोन-तीन वेळेस महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फर्सिंगमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ट्रेन चालवावी यासाठी मागणी केली होती. आज तेलंगणात अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थ्यांसाठी लिंगमपल्ली ते हटिया दरम्यान पहिली विशेष ट्रेन धावली आहे.

Leave a Comment