मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने 21 मे रोजी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार असल्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम लवकरच घोषित होणार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. कारण महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी 27 मे पूर्वी निवडणुका होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. आता निवडणुकीची तारीखही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मुंबईत ही निवडणूक येत्या 21 मे रोजी होणार आहे.
21 मे रोजी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक
आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यासाठी परवानगी दिली आहे. आज त्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली. विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्याची परवानगी या बैठकीत देण्यात आली आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोरोनाबाबतचे सगळे निर्बंध पाळण्याचे तसेच सुरक्षित निवडणूक घेण्याचे आयोगाने म्हटले आहे. या बैठकीत जवळपास सव्वा तास महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त झाले. तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त असल्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झाले तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त झाले.
राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सदस्य नसल्यामुळे 27 मे 2020 पूर्वी त्यांना विधानपरिषदेची निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. या 9 जागांसाठी कोरोना संकटानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने काल राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती.