…अशा प्रकारे बारामती झाली कोरोनामुक्त


पुणे – पवार कुटुंबियाचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती शहरातील म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय कोरोनाबाग्रस्त रुग्ण आता कोरोनामुक्त झाला आहे. पुणे शहरातील ससुन सर्वोपचार रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. या रुग्णाला गुरुवारी ससुन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती शहर सध्या कोरोनामुक्त शहर झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना कोरोनामुक्त बारामतीचे सर्व श्रेय कोरोनाविरोधातील लढ्यात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाला दिले असून ‘लॉकडाउन’च्या सर्व नियमांचे बारामतीकरांनी काटेकोरपणे पालन केल्यामुळेच हे शक्य झाल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. त्याचबरोबर महाराष्ट्रही अशाचप्रकारे लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनामुक्त बारामतीचे सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद, सर्व नगरसेवक, ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जाते. या लढाईत अनेक सामाजिक संस्थांनी देखील हातभार लावला. ‘लॉकडाउन’चे सर्व नियम तमाम बारामतीकरांनी काटेकोरपणे पाळल्याने हे सर्व शक्य झाले आहे. मी त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो! महाराष्ट्रसुद्धा अशाच पद्धतीने लवकरच कोरोनामुक्त होईल, असा मला विश्वास असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

एकूण आठ कोरोनाग्रस्त रुग्ण बारामती शहर व तालुक्यात मिळून आढळले होते. त्यापैकी समर्थ नगर येथील एक आणि माळेगाव येथील एक अशा एकूण दोन रुग्णाचा मृत्यू झाला. तर, कोरोनाची लागण झालेला पहिला रिक्षाचालक रुग्ण १६ एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला. त्यानंतर २३ एप्रिल रोजी समर्थ नगर येथील एकाच कुटुंबातील चौघेजण कोरोना मुक्त झाले. या कुटुंबातील एक वर्षाच्या चिमुकलीनेही कोरोनावर मात केली. याशिवाय, काल म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध व्यक्तीलाही पुण्याच्या ससुन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे बारामती शहर सध्या कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, गुरुवारी केंद्रीय आरोग्य पथकाने पुन्हा बारामतीला भेट दिली. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी बारामती प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची केंद्रीय पथकाने माहिती घेतली.

Leave a Comment