… तर यावेळेस स्पर्धाच रद्द करण्यात येईल ; टोकियो ऑलिम्पिक समितीचा इशारा


टोकियो : जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. जगभरातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धाही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने घेतला असून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु, कोरोनाचा कहर जर असाच सुरू राहिला तर ऑलिम्पिक पुन्हा एकदा रद्द केली जाऊ शकते, पण त्यावेळेस स्पर्धेची तारीख वाढवण्यात येणार नाही. तर पूर्ण स्पर्धाच रद्द करण्यात येईल, असा इशारा टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी दिला आहे.

या स्पर्धेच्या भविष्याबाबत टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी म्हणाले की, जर कोरोनाच्या महामारीवर भविष्यात नियंत्रण मिळवता आले नाही आणि पुन्हा एकदा ऑलिम्पिंक रद्द करण्याची वेळ आली. तर स्पर्धेची तारीख पुढे ढकलण्यात येणार नाही आणि स्पर्धा रद्द करण्यात येईल.

जुलै-ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलै-ऑगस्टमध्ये होणारी स्पर्धा रद्द करून एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धेच्या पुढील तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, पुढील वर्षी म्हणजेच, 2021मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहेत.

समितीने हे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलताना स्पष्ट केले होते की, टोकियो ऑलिम्पिक 2020 असे पुढच्या वर्षीच्या आयोजित होणाऱ्या स्पर्धेचे नाव असणार आहे. रद्द करण्यात आलेल्या स्पर्धेचा ऑलिम्पिक 2024 वर कोणताही परिणाम होणार नाही. ऑलिम्पिक चार वर्षांतून एकदा घेण्यात येते. जर 2021 हे नाव दिले असते तर पुढील ऑलिम्पिकचे आयोजन 2025 साली करावे लागले असते. म्हणून स्पर्धा जरी 2021 साली घेण्यात येणार असल्या तरी नाव हे ऑलिम्पिक 2020 असणार आहे. या संकटाचा जपान सरकार, टोकियोचे स्थानिक प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने आपण सामना करु असा मला विश्वास आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस ब्लाख यांनी आभार मानले होते.

Leave a Comment