आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची वर्क फ्रॉम होमची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली


नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मंगळवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केली. त्याचबरोबर प्रसाद यांनी यावेळी आयटी क्षेत्रातील ८५ टक्के काम घरुनच केले जात असल्याचेही सांगितले. ३० एप्रिल रोजी वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी संपत आहे. प्रसाद यांनी ही घोषणा राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान केली.

प्रसाद यांनी यावेळी सरकारने अनेक सवलती वर्क फ्रॉम होमसंदर्भात दिल्या असल्याचाही उल्लेख केला. वेगवेगळ्या राज्यातील आयटी सेक्रेट्री, कम्युनिकेशन सेक्रेट्री आणि पोस्टल सेक्रेट्रींनी या बैठकीमध्ये प्रेझेंटेशन सादर करुन कोणकोणत्या गोष्टींची राज्यांना केंद्राकडून अपेक्षा आहे हे सांगितले. घरुन काम करण्याचे नियम शिथिल करण्यात आले आहे. प्रसाद यावेळी म्हणाले की, घरुन काम करणे हे सर्वसामान्य व्हावे यासाठी आम्हा प्रयत्नशील असून नवीन उद्योजकांनी या संदर्भातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षाही प्रसाद यांनी व्यक्त केली.

सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतींमध्ये सुरक्षा ठेवींमध्ये सूट, काही ठिकाणी व्हिपीएन न वापरता काम कऱण्याची सूट, घरी काम करण्यासंदर्भात उपकरणे पुरवण्यासाठी परवानगीमध्ये सूट देण्याचा समावेश आहे. आयटी कंपन्यांनी घरुन काम कऱण्याची परवानगी देण्यासंदर्भात १३ मार्च रोजी सरकारने सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार हा कालावधी ३० एप्रिलला संपणार होता. पण आता तो वाढवण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रभाव भारतामधील आयटी क्षेत्रातील प्रमुख केंद्र असणाऱ्या बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे यासारख्या शहरांमध्ये अधिक असल्याने येथील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रसाद यांनी कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाणा आणि तेलंगणामधील माहिती तंत्रज्ञान विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना राज्य सरकारांनी ‘भारत नेट’ प्रकल्पाला सहाय्य करण्याची मागणी केली. इंटरनेटचे जाळे ‘भारत नेट’च्या माध्यमातून अधिक भक्कम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांना अधिक चांगल्या सेवेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी नवीन उपकरणे बसवण्यासंदर्भात राज्य सरकारने परवानगी देण्यासंदर्भातही प्रसाद यांनी सुचना केल्या.

प्रसाद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी त्यावेळी बिहारचे उप-मुख्यमंत्री सुशील मोदी यांनी प्रत्येक राज्यामध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्तम मार्गांची माहिती देणारे एक अ‍ॅप तयार करण्यासंदर्भात विनंती केली असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली. हा सल्ला चांगला असल्याचे सांगत आम्ही यासंदर्भात काम सुरु केले आहे. नॅशनल इ गव्हर्नन्स डिव्हीजन (एनईजीडी) आणि नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरला (एनआयसी) मी एक अ‍ॅप बनवण्यास सांगितले आहे. दोन्ही संस्थांनी तीन दिवसांमध्ये अ‍ॅप बनवून देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवल्याचे प्रसाद यांनी सांगितले म्हणाले.

आरोग्य सेतू अ‍ॅप आणि ते बनवणाऱ्यांचेही प्रसाद यांनी कौतुक केले. ई-पास या अ‍ॅपवरुन उपलब्ध करुन देण्याची सुविधा देण्यात यावी या मागणीला सर्वांनी होकार दर्शवला असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. सर्व आरोग्य सेतू अ‍ॅप हे जिल्हा स्तरावर जोडले जाणार आहेत. आरोग्य सेतू अ‍ॅप खूपच लोकप्रिय झाल्याचेही प्रसाद म्हणाले. प्रसाद यांनी टपाल खात्याचेही कौतुक केले आहे. सामाजिक काम तसेच डिजीटल पेमेंटसारख्या गोष्टी टपाल खात्याकडून छान पद्धतीने हाताळल्या जात आहेत. राज्य सरकारांकडून टपाल खात्याचा योग्य पद्धतीने वापर केला जाईल अशी अपेक्षाही प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment