वांद्रे गर्दी प्रकरणातील विनय दुबेचा जामीन मंजूर


मुंबई – मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशन बाहेर १४ एप्रिल रोजी ३ ते ४ हजार परप्रांतीयांचा जमाव जमा झाला होता. उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याचा एक व्हिडीओ या जमावाला वांद्रे स्टेशनबाहेर जमवण्यासाठी कारणीभूत ठरला होता. त्याचा हा व्हिडीओ चांगलचा व्हायरल झाला होता. मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी विनय दुबे याचा दांडगा जनसंपर्क आहे. १४ एप्रिलचा लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. तरीही १४ एप्रिल रोजी वांद्रे स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता.

दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विनय दुबे याच्यावर कारवाई करत पोलीसांनी त्याला अटक केली होती. पण आज वांद्रे कोर्टाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. १५ हजाराच्या जातमुचलक्यावर वांद्रे कोर्टाने विनय दुबेला जामीन मंजूर केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउन असल्याने ट्रेन, बससह इतर सगळ्या वाहतुकीच्या सेवा बंद असल्यामुळे हातावरचे पोट असलेले अनेक कामगार मुंबईतच अडकले. मुंबईतील वांद्रे स्टेशनवर हेच कामगार १४ एप्रिल रोजी जमा झाले होते. या सगळ्या गर्दीला कारणीभूत ठरलेल्या विनय दुबेला अटक करण्यात आली होती. आता आज त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Comment