जगभरातील कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय


नवी दिल्ली : संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात इशारा दिला आहे. आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका आणि आशियाखंडातील काही देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय असल्याचे मत आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर युरोपीय देशांमध्ये शिथील करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अद्याप खूप वेळ जावा लागणार आहे.

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारी बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितले की, टेस्टिंग कपॅसिटी या देशांमध्ये फार कमी असल्यामुळे मृतांचा आणि कोरोनाची लागण झालेल्यांची योग्य आकडेवारी समजणे कठिण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इबोला व्हायरस दरम्यान, वॅक्सिन तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि कोरोनाच्या बाबतीत देखील आम्ही असेच करणार आहोत. ते पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी याआधीही कोरोनासाठी औषध तयार केले आहे.

लहान मुलांना तुलनेने कोरोनामुळे निर्माण होणारे इतर गंभीर आजार आणि मृत्यूचा कमी धोका आहे. पण इतर रोगांचा जास्त धोका असू शकतो ज्या लसीद्वारे रोखता येऊ शकते, अशी महिती टेड्रोस यांनी दिली आहे. जगभरातील जवळपास 1 कोटी 30 लाख लोकांना योग्य वेळी लसीकरण न केल्याने पोलिओ, कावीळ, कॉलरा, गोवरसारख्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अनेक देशांच्या सीमा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्या असून वाहतुकदेखील बंद आहे. यामुळे जवळपास 21 देशांमध्ये इतर आजारांच्या लसींची कमतरता निर्माण झाली असल्याचे ट्रेड्रोस यांनी सांगितले आहे. मलेरियाचे रुग्ण आफ्रिकेत दुपटीने वाढले आहेत. हे असे होणे फार गंभीर आहे. मदत करण्यासाठी आम्ही काही देशांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा परिणाम मलेरियासंबंधी आरोग्य सेवेवर झाल्याचे ते म्हणाले आहेत.

Leave a Comment