इंटरनॅशनल रेसक्यू कमिटीचे भाकित; कोरोनामुळे 30 लाखांपेक्षा जास्त लोक आपल्या जीवाला मुकणार


लंडन : जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असून जगभरातील 185 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. जगभरातील 30 लाखाहून अधिक लोकांना या जीवघेण्या व्हायरसची लागण झाली आहे, तर 2 लाख जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. ब्रिटनच्या इंटरनॅशनल रेसक्यू कमिटीने या पार्श्वभूमीवर मोठे भाकित केले आहे. जगभरातील तब्बल 100 कोटी लोक कोरोनामुळे बाधित होतील, तर या व्हायरसमुळे 30 लाखांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागेल अशी भीती आयआरसीने व्यक्त केली आहे. हा भीतीदायक अंदाज आयआरसीचे प्रमुख डेव्हिड मिलीबँड यांनी तयार केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.या संदर्भातील वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.

आयआरसीच्या मते, या व्हायरस वरील प्रतिबंधक लस निघून त्याचा वापर सुरू व्हायला जास्त वेळ लागणार आहे. तोपर्यंत कोरोना आपली पकड आणखी घट्ट करणार आहे. आफ्रिका आणि आशियातील गरीब देश यात सर्वाधिक भरडले जाणार आहेत. आर्थिक पाठबळ आणि आरोग्यविषयक सुविधा या देशांजवळ नसल्यामुळे जगभरातील 34 देश या व्हायरसच्या रडारावर असणार आहेत.

सुदैवाने भारताचा या यादीत समावेश नाही. पण या यादीत भारताच्या शेजारील तीन राष्ट्रांचा समावेश आहे. यात पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारचा समावेश आहे. सर्वाधिक लोकसंख्या, पायाभूत सुविधांची कमतरता आणि दाट वस्ती यामुळे कुठल्याही नियमांचे पालन होऊ शकत नसल्याचेही आयआरसीच्या अहवालात म्हटले आहे.

या गरीब देशांना जगातील दिग्गज राष्ट्रांनी मदत करावी. कोरोना ही जागतिक महामारी असेल तर सर्व देशांनी मिळून याचा मुकाबला केला पाहिजे, तरच त्यावर मात करता येईल अन्यथा काहीही करता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शक्य ते सर्व प्रयत्न कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केले जात आहे. अनेक टेस्ट केल्या जात आहेत, व्यक्तीनुसार तपासण्या होत आहेत. पण आता एखाद्या क्षेत्रात कोरोना व्हायरसचे संक्रमण तर झाले नाही ना हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी सांडपाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा व्हायरस कोरोना रुग्णाच्या मलातही असतो. हा मल शौचानंतर मलवाहिन्यांमार्फत सीवेज ट्रिटमेंट प्लांटपर्यंत पोहोचतो आणि त्याचे परीक्षण करून त्या क्षेत्रातील संक्रमणाची माहिती मिळू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या एखाद्या क्षेत्रात जास्त असेल तर त्या ठिकाणाच्या सांडपाण्यात संक्रमित मलाची मात्राही जास्त असेल आणि अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात संक्रमित असलेल्या क्षेत्राची माहिती मिळू शकते.

Leave a Comment