55 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलीसांनी घरीच थांबावे; मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश


मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोरोनाशी फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांनी घरीच थांबावे, त्याचबरोबर त्यांनी बंदोबस्तात सहभागी होऊ नये, असे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

आठवड्याचे सात दिवस आणि 24 तास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून मुंबई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांना गेल्या तीन दिवसात कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर तातडीने पावले उचलत पोलीस आयुक्तांनी 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे जे पोलीस कर्मचारी दगावले त्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे पोलीस कर्मचारी पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुक्त परमबीर सिंह यांनी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment