बेस्टच्या 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, तर एकाचा मृत्यू


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत दररोज वाढ होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5776 वर पोहोचला असून आतापर्यंत 219 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच चिंताजनक बाब अशी की, कोरोना व्हायरसचा आरोग्य, पोलीस यांच्यापाठोपाठ मुंबईतील बेस्ट सेवेतही शिरकाव झाला आहे. कोरोनाची आतापर्यंत 15 कर्मचाऱ्यांना लागण झाली असून त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

या 15 पैकी 4 जणांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री अथवा प्रतिबंधित क्षेत्रातला संपर्क नसल्याची माहिती बेस्टच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. बेस्टमधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये समावेश आहे. सात कंडक्टर आणि चार चालक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर बेस्टच्या विद्युत विभागातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी एका कोरोनाबाधित कर्मचाऱ्याचा आधीच मृत्यू झाला आहे. तर परिवहन अभियांत्रिकी विभागातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

बेस्टच्या 250 जणांच्या स्टाफला आतापर्यंत क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. त्यापैकी 150 जणांचा 14 दिवसांचा क्वॉरन्टाईन कालावधी संपला आहे. हे कर्मचारी मेडिकल फिटनेस बघून क्वॉरन्टाईन कालावधी संपल्यानंतर कामावर रुजू झाले आहेत. आतापर्यंत 7500 कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. रजेनंतर कामावर रुजू होणाऱ्या 250 जणांचे सेल्फ डिक्लरेशनही घेण्यात आले आहे. दरम्यान, बेस्ट बस ही लॉकडाऊनच्या काळात मुंबईत सुरु असलेली एकमेव सार्वजनिक वाहतुकीची सेवा आहे. सध्या बसमधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक होत आहे. एक चालक आणि कंडक्टर प्रत्येक बसमध्ये असतो. काही वेळा एक अतिरिक्त सहाय्यक असतो.

Leave a Comment