पुण्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने आता 2 ऐवजी 4 तास राहणार खुली


पुणे : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्यानंतर मुंबईला लागून असलेले पुणे शहरदेखील कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. पुण्यात लॉकडाऊनच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करूनही गेल्या आठवड्यात पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 606 वरुन थेट 1319 वर पोहोचल्यामुळे पुणे महानगरपालिकेने शेवटचा पर्याय म्हणून अतिसंक्रमित भागातून नागरिकांना हलवण्याचा उपाय सुचवला आहे. त्यातच पोलिसांनी लॉकडाऊनबाबत पुणेकरांसाठी नवा आदेश जारी केला आहे.

काल म्हणजेच सोमवारी पुणे पोलिसांचे लॉकडाऊन संबंधीचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार आता अत्यावश्यक सेवेची दुकाने आता 2 ऐवजी 4 तास खुली राहणार आहेत. पुण्यातील नागरिक सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत भाजीपाला, दूध, किराणा मालासाठी घराशेजारच्या दुकानात जाऊ शकतील, असे पुण्याचे सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी आपल्या नव्या आदेशात म्हटले आहे. दुकानांची वेळ महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विनंतीनुसार वाढवून दिल्याची माहिती सहपोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.

पुणे महापालिकेची अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरते स्थलांतरित करण्याची योजना असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ, कसबा पेठ, ढोले पाटील रस्ता या वॉर्डात झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली दाटीवाटीची वस्ती, छोटी घरे यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून कासेवाडी आणि इतर काही झोपडपट्टी भागात कोरोनाचे अधिक रुग्ण सापडत असल्यामुळे अशा हॉटस्पॉट्समधून नागरिकांचे स्थलांतर करण्याचा उपाय पालिका करणार आहे. तात्पुरत्या क्वारंटाइन सेंटरमध्ये त्यांची सोय करण्याची महापालिकेची तयारी आहे.

महापालिका पहिल्या टप्प्यात 20 हजार लोकांना स्थलांतरित करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी पोलीस आणि वॉर्ड ऑफिसर यांच्यावर जबाबदारी देण्यात येईल. तात्पुरत्या स्थलांतराचा प्रस्ताव पुणे पोलिसांनीच दिल्याचे समजते. दाट लोकवस्तीमुळे लॉकडाऊनचा फायदा होईना, म्हणून स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यामधील रुग्णांमध्ये मुंबईच्या तुलनेत कमी वाढ होत असली तरीही लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता पुण्यात सध्या होणारी वाढही चिंतेचा विषय आहे. पुण्याच्या तुलनेत मुंबईतील लोकसंख्येची घनता कितीतरी अधिक असल्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात निर्बंध अधिक कठोर केल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानेही चिंता व्यक्त केली होती. 7 दिवसांत रुग्णसंख्येत दुप्पट वाढ होत असून 9 पैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याचे निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवले आहे. पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1457 झाली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात 1319 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Leave a Comment