राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये 522 नवीन रुग्णांची वाढ; रुग्णांचा आकडा 8590 वर


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात काल दिवसभरात 522 नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8590 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यात काल 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 15 जण मुंबईचे तर पुण्यातील 4 आणि अमरावती शहरातील 6 तर जळगाव आणि औरंगाबाद येथील येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (अमरावती शहरातील मृत्यू 20 ते 25 एप्रिल या कालावधीतील आहे). आतापर्यंत राज्यात 369 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे काल 94 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कालपर्यंत राज्यातील पाठवण्यात आलेल्या 1 लाख 21 हजार 562 नमुन्यांपैकी 1 लाख 12 हजार 552 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 8590 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 677 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 9399 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1282 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 15 पुरूष तर 12 महिला आहेत. त्यातील 13 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 8 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर सहा रुग्ण 40 वर्षांखालील आहे.

Leave a Comment