हा शेतमजूर हजसाठी जमा केलेल्या पैशातून करत आहे गरजूंची मदत


मागील अनेक वर्षांपासून हज यात्रेला जाण्याचे स्वप्न उराशी बागळून कर्नाटकतील एका खेड्यातील शेतमजुरी करणारे अब्दुरेहमान गुद्दीनाबली पैसे गोळा करत होते. त्यानुसार अब्दुरेहमान पुढील वर्षी हज यात्रेला जाण्याचा विचार करत होते. अब्दुरेहमान गुद्दीनाबली हे मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हज येथील मक्का येथील मशीदीला भेट देण्यासाठी पैसे जमवत होते. पण आता अब्दुलरेहमान यांनी सध्याची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता ते पैसे गरजूंचे पोट भरण्यासाठी वापरणे अधिक महत्वाचे ठरेल असा विचार करत स्वत:चे स्वप्न बाजूला ठेवून गरजूंना या पैशांमधून अन्नधान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

मंगळूरजवळील एका खेड्यात राहणारे ५५ वर्षीय अब्दुरेहमान गरिबांना सध्या किराणा सामानाचे वाटप करत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना अब्दुरेहमानचा मुलगा इलायस सांगतो, की माझ्या वडिलांनाही कोणत्याही सर्वसामान्य मुस्लीमाप्रमाणे हज यात्रेला जायचे होते. ते शेतमजूर आहेत. तर माझी आई बिडी कामगार आहे. ते मागील अनेक वर्षांपासून हज यात्रेसाठी पैसे गोळा करत होते. पण लोक उपाशी राहत असताना आपण पैसे गोळा करुन ठेवल्याने आपल्याला पाप लागेल असे त्यांना वाटल्यामुळेच त्यांनी या पैशांमधून गरिबांना अन्नधान्य वाटण्यास सुरुवात केली.

आत्तापर्यंत बंटवाल तालुक्यातील गुद्दीनाबली गावातील २५ कुटुंबांना अब्दुरेहमान यांनी तांदूळ तसेच अन्य किराणा मालाच्या गोष्टींचे वाटप केले आहे. लोकांना लॉकडाउनमुळे रोजंदारी बंद झाल्याने काम मिळत नसल्याचे पाहून मला त्यांची चिंता वाटू लागल्यामुळेच मी जमवलेल्या पैशांमधून अन्नधान्य वाटण्याचा निर्णय घेतल्याचे, असं अब्दुरेहमान सांगतात.

दरम्यान हज यात्रेसाठी अब्दुरेहमान यांनी किती रक्कम गोळा केली होती याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अब्दुरेहमान यांनी अन्नधान्य वाटप करण्यासाठी ८० हजार रुपये खर्च केल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

Leave a Comment