बायकोने लुडोमध्ये हरवले; नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा


अहमदाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशव्यापी लॉकडाऊन सुरु असल्यामुळे आपल्यापैकी अनेकजण घरी बसून टाईमपास म्हणून आपल्या आवडीचे गेम खेळत आपला दिवस घालवत आहेत. त्यातच सध्याच्या मोबाइलवर ‘लूडो’ नावाचा ऑनलाइन गेम सर्रास खेळला जात आहे. पण, हा लूडो गेम गुजरातच्या बडोद्यात एका कुटुंबासाठी वादाचे कारण ठरला आहे. या गमेमध्ये पत्नीकडून वारंवार पराभव झाल्यानंतर तेथील एका दाम्पत्यामध्ये भांडणाला सुरूवात झाली. हा वाद एवढा टोकाला पोहचला की पत्नीला मारहाण करत पतीने तिच्या पाठीचा कणाच तोडल्यामुळे अखेर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही घटना ‘181 अभयम हेल्पलाइन’मध्ये आलेल्या तक्रारीनंतर समोर आली असून यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, वेमाली येथे राहणारी एक २४ वर्षीय महिला घरात शिकवणी घेते. तर, तिचा पती एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. पतीने लॉकडाउनदरम्यान सोसायटीमध्ये बाहेर इतरांसोबत वेळ घालवण्याऐवजी घरातच राहावे यासाठी त्याला मोबाइलवर लूडो गेम खेळण्यास तिने तयार केले आणि तो गेम खेळण्यास तयार देखील झाला. पण, पत्नीकडून सलग ३-४ गेममध्ये त्याचा पराभव झाला.

पत्नीकडून सलग तीन-चार गेममध्ये पराभूत झाल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीसोबत वाद घालायला सुरूवात केली. दोघांमधील वाद नंतर एवढा शिगेला पोहोचला की, पत्नीला त्याने बेदम मारहाण सुरू केली. तिच्या पाठीच्या कण्याला या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पत्नीने उपचारानंतर पतीच्या घरी जाण्यास नकार देत माहेरी जाण्याची तयारी केली होती. पण, दोघांच्या समुपदेशनानंतर पतीने पत्नीची माफी मागितल्यामुळे पत्नीने त्याच्यासोबत पुन्हा घरी जाण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पत्नीला पुन्हा मारहाण न करण्याची ताकीद पतीला देण्यात आल्याची माहिती ‘181 अभयम हेल्पलाइन’कडून देण्यात आली आहे.

Leave a Comment