देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २७८०० च्याही पुढे; २४ तासात सापडले १३९६ नवे रुग्ण


नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी देशभरात मागील २४ तासात कोरोनाचे १३९६ नवे रुग्ण आढळल्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता २७ हजार ८९२ एवढी झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान एका दिवसात ३८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ६ हजार १८४ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

देशभरात १६ जिल्हे असे आहेत ज्याठिकाणी मागील २८ दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर देशातील ८५ जिल्हे असे आहेत त्याठिकाणी मागील १४ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान कोणतेही गैरसमज करोनाबाबत बाळगू नका. हा बरा होणारा आजार असून कोरोना झालेल्या रुग्णांकडे तुच्छ दृष्टीकोनातून पाहू नका. आपल्याला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडे तिरस्काराच्या नजरेने पाहू नका असेही आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.

त्याचबरोबर कोरोनाबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, तसेच कोरोनाचे कोणत्याही धर्म किंवा पंथाला लेबल लावू नका. कोरोना जातधर्म बघत नाही, तो कुणालाही होऊ शकतो. हा एक संसर्गजन्य आजार असून तो बरा होतो त्यामुळे कुठेही तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करु नका असे आवाहनही अग्रवाल यांनी केले आहे.

Leave a Comment